हद्दीच्या वादात पूल अंधारात
By admin | Published: April 24, 2017 01:53 AM2017-04-24T01:53:12+5:302017-04-24T01:53:24+5:30
नाशिक : तपोवनापासून थेट टाकळीला जोडणाऱ्या नवीन रिंगरोडवरील पूल हद्दीच्या वादामुळे मागील दोन महिन्यांपासून अंधारात सापडला आहे
नाशिक : तपोवनापासून थेट टाकळीला जोडणाऱ्या नवीन रिंगरोडवरील पूल हद्दीच्या वादामुळे मागील दोन महिन्यांपासून अंधारात सापडला आहे. दोन्ही बाजूंनी रस्त्याला उतार असून, नवीन रस्ता असल्यामुळे वाहतुकीचा वेगही वाढल्याने रात्रीच्या वेळी अंधारामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे
महापालिका प्रशासनाकडे वारंवार ‘स्मार्ट’ तक्रार करूनदेखील या पुलावरील पथदीप अद्याप दुरुस्त करण्यात आलेले नाही; मात्र ‘स्मार्ट अॅप’वर प्राप्त तक्रार तत्काळ ‘क्लोज’ करण्यात येते, असे एका जागरूक नागरिकाने सांगितले आहे. एकूणच ज्याप्रमाणे पथदीप बंद आहे त्याचप्रमाणे स्मार्ट तक्रारदेखील दखल न घेता बंद केली जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पुलावर गेल्या दोन महिन्यांपासून अंधार पसरला आहे; मात्र केवळ महापालिकेच्या पूर्व व पंचवटी विभागाच्या हद्दीमुळे अद्याप या पुलावरील पथदीपांची दुरुस्ती होऊ शकलेली नाही. पूर्व विद्युत विभागाकडून सदर पूल पंचवटीच्या हद्दीत असल्याचे सांगितले जाते तर पंचवटी विद्युत विभागाकडून पुलाचा भाग पूर्वच्या हद्दीत समाविष्ट असल्याचे कळविले जाते. एकूणच नेमका पूल कोणाच्या हद्दीत हा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या या दोन्ही विभागांमध्ये समन्वयाचा ‘पूल’ तयार होणे गरजेचे असून, तातडीने पूर्व किंवा पंचवटी दोन्हीपैकी कोणीही पुढाकार घेऊन बंद पडलेले पथदीप त्वरित सुरू करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
औरंगाबाद महामार्ग ते टाकळीमार्गे पुणे महामार्गाला जोडणारा हा रिंगरोड सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकसित करण्यात आला.
या रस्त्यावर वाहतूकही वाढली असून, लहान-मोठ्या अवजड वाहनांसह शेतकऱ्यांची या रस्त्यावरून वर्दळ सुरू असते. या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी मार्गक्रमण करताना रस्त्यावरील मुख्य पुलाचा परिसर अंधारात बुडालेला असतो. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
पुलाच्या दोन्ही बाजूंनी तीव्र उतार असल्यामुळे वाहनांचा वेग अधिक असतो व वाहने जवळ येईपर्यंत नजरेस पडत नाही. महापालिकेने या पुलावरील बंद पडलेले पथदीप त्वरित सुरू करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)