बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू
By admin | Published: September 1, 2016 10:32 PM2016-09-01T22:32:45+5:302016-09-01T22:32:57+5:30
मडकीजांब : पोळा सणावर शोककळा
दिंडोरी : पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी वडिलांसोबत
गेलेल्या मुलाचा पाझर तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तालुक्यातील मडकीजांब येथे ही घटना घडली.
मडकीजांब येथील प्रकाश राजेंद्र मुळाणे हा पाचवीत शिकणारा
मुलगा पोळानिमित्त बुधवारी वडिलांसोबत पाझर तलावावर बैल धुण्यासाठी गेला होता. वडील बैल धूत असताना पाठीमागे असलेला प्रकाश पाण्यात बुडाला. त्याचा ग्रामस्थांनी शोध घेतला मात्र तो सापडला नाही. गुरुवारी सकाळी प्रांताधिकारी मुकेश भोगे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पोलीस निरीक्षक मधुकर
गावित यांनी घटनास्थळी भेट
देत अग्निशमन दलाला पाचारण केले.
घटनास्थळी प्रांताधिकारी मुकेश भोगे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पोलीस निरीक्षक मधुकर गावित, माजी सभापती भास्करराव भगरे, अनिल देशमुख, गटशिक्षणाधिकारी सुषमा घोलप, शिक्षण विस्तार अधिकारी डी. डी. देवरे आदिंनी भेट देऊन मदतकार्य राबवण्यासाठी सूचना दिल्या. अग्निशमन दलाच्या
जवानांनी मदतकार्य करून मुलाचा शोध घेतला.
यावेळी गावातील युवकांनी शोधमोहीम राबविण्यास सहकार्य केले. या घटनेने पोळ्याच्या दिवशी मडकीजांबकरांवर शोककळा पसरली. सायंकाळी शोकाकुल वातावरणात प्रकाशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)