इगतपुरीत बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा ठार; शेळ्या चारताना घातली झडप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 10:51 PM2021-10-18T22:51:26+5:302021-10-18T22:51:35+5:30
इगतपुरीत पुन्हा मानव-बिबट संघर्ष. वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता घटनेची माहिती गावातून उशिरा मिळाली, त्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात आले.
नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात पुन्हा मानव-बिबट संघर्ष उफाळून येताना दिसत आहे. भंडारदरा रस्त्यावर इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील काळुस्ते-दरेवाडी शिवारातील जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका मुलावर बिबट्याने सोमवारी (दि. १८) संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास झडप घातली. या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नाशिक पश्चिम वनविभागाच्या हद्दीत बिबट्याचे मानवी हल्ले वाढू लागले आहे. नाशिक तालुक्यातील गिरणारेजवळ पंधरवड्यापूर्वी घडलेल्या घटनेनंतर काळुस्ते-दरेवाडीत बिबट्याच्या हल्ल्याच अल्पवयीन मुलाचा बळी गेला. दीपक विठ्ठल गावंडा (१०) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास सूर्यप्रकाश असतानासुद्धा बिबट्याने मुलावर हल्ला केला. ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मुलाचा शोध घेतला असता मृतावस्थेत दीपक आढळून आला. वनविभागाचे पथक घटना घडल्यानंतर सुमारे चार तास उशिराने घटनास्थळी दाखल झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता घटनेची माहिती गावातून उशिरा मिळाली, त्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात आले. अतिदुर्गम भाग असल्यामुळे या भागात मोबाईलला श्यक्यतो लवकर रेंज मिळत नसल्याने संपर्क साधण्यास अडथळा निर्माण झाला होता. मागील अठरा दिवसात जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात हा तिसरा अल्पवयीन मुलाचा बळी गेला आहे. पंधरवड्यापूर्वी दिंडोरी तालुक्यातील जुने धागूर शिवारात चार वर्षाच्या बालिकेला बिबट्याने फरपटत ऊस क्षेत्रात नेले होते.