पाटोद्यात बैल धुण्यासाठी गेलेला मुलगा बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 01:51 AM2018-09-10T01:51:55+5:302018-09-10T01:52:01+5:30
पोळ्याच्या सणासाठी बैल धुण्यासाठी गेलेला दहावीतील गोकुळ अण्णासाहेब तनपुरे हा पालखेड कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
पाटोदा : पोळ्याच्या सणासाठी बैल धुण्यासाठी गेलेला दहावीतील गोकुळ अण्णासाहेब तनपुरे हा पालखेड कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
आडगाव रेपाळ येथील काही नागरिक, मुले पाणी उपलब्ध नसल्याने पाटोदा पालखेड कालव्यावर बैल धुण्यासाठी आले होते. कालव्यास आवर्तन सुरु आहे. गोकुळ बैल धुण्यासाठी कालव्यात उतरला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात वाहत गेला.
तेथे उपस्थित नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रवाहाचा वेग असल्याने काही वेळातच तो दिसेनासा झाला. नागरिकांनी पालखेड कालवा विभागास कळवून पाण्याचा विसर्ग कमी करण्यासाठी विनंती केली. तसेच पाठीमागे असलेल्या पाटचारी सुरु करून विसर्ग कमी केला. परिसरातील नागरिकांनी मानवी साखळी करून कालव्यात उतरून सुमारे बारा तेरा किलोमीटर शोध घेतला मात्र गोकुळ सापडला नाही. अद्यापही शोध मोहीम सुरूच आहे. गोकुळ हा आडगाव रेपाळ येथील शेतकरी अण्णासाहेब तनपुरे यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो येथील जनता विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकतो.