मालेगावी आईच्या खूनप्रकरणी मुलास जन्मठेप
By admin | Published: January 19, 2017 12:34 AM2017-01-19T00:34:55+5:302017-01-19T00:35:19+5:30
मालेगावी आईच्या खूनप्रकरणी मुलास जन्मठेप
मालेगाव : दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून १६ मार्च २०१४ रोजी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास आईचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी आरोपी रवींद्र महारू खैरनार (३१), रा. पाटणे यास जिल्हा न्यायाधीश एस. एस. खंडागळे यांनी दहा हजार रुपये दंड व जन्मठेप तसेच दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. रूपचंद खैरनार हा त्याची पत्नी तोल्याबाईसह पाटणेत राहून शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत होता. त्याला लक्ष्मण व अंबादास हे दोन मुले असून, ती कामानिमित्त नाशिक येथे परिवारासह राहतात. त्यांच्या शेजारी चुलत सून सगुनाबाई महारू खैरनार व तिचा मुलगा रवींद्र महारू खैरनार, त्याची पत्नी मनीषा आणि पाच नातवंडांसह मजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. १० मार्च २०१४ पासून रवींद्र हा अति मद्यसेवन करून आई सगुनाबाई व पत्नी मनीषा यांच्याशी भांडण करीत होता. सासू तिच्या सोबत जाण्यास तयार न झाल्याने तिने सासूला शंभर रुपये दिले व मुलांसह माहेरी निघून गेली. त्यानंतर रवींद्रने सगुनाबाईकडून शंभर रुपये हिसकावून घेत आईशी भांडण व मारहाण करीत होता. दारू पिण्यास पैसे न दिल्याने १५ मार्च २०१४ रोजी रात्री आठ वाजेपासून सगुनाबाईशी तिचा मुलगा रवींद्र भांडण करीत होता. १६ मार्च २०१४ रोजी पहाटे पावणेपाच वाजता रवींद्र व सगुनाबाई यांच्यात जोरदार भांडण झाले. भांडणाचा आवाज ऐकू आल्याने फिर्यादी रूपचंद खैरनार व नानाजी खैरनार घरात गेले असता तो आईचा गळा दाबण्याचा प्रयत्न करीत होता. भांडणात मध्ये पडलात तर चाकूने ठार मारण्याची धमकी दिली. आई काही हालचाल करीत नाही व बोलत नाही असे ओरडत आरोपी रवींद्र घराबाहेर आला. वसंत खैरनार यांनी घरात बघितले असता सगुनाबाईचा मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)