भाडेवाढी विरोधात नाशिकला व्यापाऱ्यांचा लिलावावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 07:03 PM2018-08-01T19:03:43+5:302018-08-01T19:09:18+5:30
नाशिक उत्पन्न बाजारसमितीत काही वर्षांपूर्वी तत्कालीन संचालक मंडळाने सुमारे दीडशेहून अधिक तात्पुरते गाळे व्यापारी वर्गाला भाड्याने दिले असून, जागा समान असली तरी भाडेवाढ वार्षिक चार ते साठ हजार रुपये घेतले जाते. मात्र सदर भाडे हे कमी असल्याचे बाजार समितीच्या लक्षात आल्याने त्यात वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेवून
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीने व्यापारी गाळ्यांचे भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त झालेल्या व्यापा-यांनी बुधवारी अचानक लिलावावर बहिष्कार टाकल्याने सकाळी तीन तास फळभाज्यांचे लिलाव ठप्प झाले. व्यापा-यांच्या या पावित्र्याने दुपारी बाजारसमितीत संचालक व व्यापा-यांची संयुक्त बैठक घेण्यात आली परंतु ती निष्फळ ठरल्याने उशीराने लिलाव सुरू झाल्यामुळे जिल्हाभरातून बाजारसमितीत शेतमाल विक्रीसाठी आणलेल्या शेतक-यांचे हाल होवून बाजारभाव कोसळल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
नाशिक उत्पन्न बाजारसमितीत काही वर्षांपूर्वी तत्कालीन संचालक मंडळाने सुमारे दीडशेहून अधिक तात्पुरते गाळे व्यापारी वर्गाला भाड्याने दिले असून, जागा समान असली तरी भाडेवाढ वार्षिक चार ते साठ हजार रुपये घेतले जाते. मात्र सदर भाडे हे कमी असल्याचे बाजार समितीच्या लक्षात आल्याने त्यात वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेवून १०० चौरस फुटाला प्रति दिन ५० रुपये या प्रमाणे व्यापा-यांना भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला काही व्यापा-यांनी विरोध दर्शविल्याने व्यापारी व बाजारसमिती यांच्यात वाद झाला होता. त्यातूनच दरम्यान बुधवारी व्यापा-यांनी लिलावावर बहिष्कार टाकल्याने सकाळी सुमारे तीन तास लिलाव प्रक्रिया ठप्प झाली. त्यामुळे बाजार समितीत शेतमाल लिलावासाठी घेवून आलेल्या शेतक-यांमध्ये संताप व्यक्त केला जात असताना त्यावर तोडगा काढण्यासाठी बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, संचालक जगदीश अपसुंदे, संदीप पाटील, प्रवीण नागरे यांनी व्यापाºयांची संयुक्त बैठक घेण्यात आलीा. त्यात बाजार समितीने गाळे भाडेवाढीवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला तर व्यापा-यांनी त्यास विरोध दर्शविल्याने बैठकीतून काहीही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे लिलावाविषयी अनिश्चितता निर्माण झाली. अशातच काही व्यापा-यांनी दुपारी तीन वाजता लिलाव सुरू केले. मात्र सकाळपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शेकडो शेतकरी आपला माल विक्रीसाठी घेवून आले, परंतु वेळेत लिलाव न झाल्याने त्यांना मोठे नुकसान सोसावे लागले.