ब्रह्मचैतन्य महोत्सवाला उत्साहात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:09 AM2019-11-24T00:09:40+5:302019-11-24T00:09:59+5:30
शंकराचार्य न्यास आणि भूपाली क्रिएटीव्हज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून ब्रह्मचैतन्य संगीत महोत्सवाला शनिवारी उत्साहात सुरुवात झाली.
नाशिक : शंकराचार्य न्यास आणि भूपाली क्रिएटीव्हज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून ब्रह्मचैतन्य संगीत महोत्सवाला शनिवारी उत्साहात सुरुवात झाली. पं. फिरोझ दस्तूर यांचे शिष्य पं. चंद्रशेखर वझे यांनी पुरीया रागातील मैफलीने या महोत्सवाचा प्रारंभ केला.
गंगापूररोडवरील कुर्तकोटी सभागृहात दोन दिवसांच्या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे चिन्मय मिशनचे स्वामी अद्वैतानंद, रवींद्र वाडेकर आणि संयोजक संदीप आपटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. सुरु वातीला पं. वझे यांच्या गायनाची मैफल झाली.
त्यांनी मैफलीच्या प्रारंभी पुरीया रागातील आज मोरे घर आयो सगुण रूपमें साक्षात परब्रह्म... ही एकतालातील विलंबित बंदिश सादर केली. बीत गयो जनम तिहारो... या तीनतालातील द्रुत बंदीशीनंतर तराणा पेश केला. मधुकंस रागातील झपतालात देहो दरस मोहें राम...ही मध्य लयीतील बंदीश रंगली. सुनो मेरी विनती प्रभूजी....या द्रुत तीन तालातील बंदीशीनंतर संत तुकाराम महाराजांच्या ज्ञानियांचा राजा या अभंगाने त्यांनी मैफलीचा समारोप केला. त्यांना तानपुरा साथ शरयू माथूर व मनोज कट्टी यांनी, तर ऋग्वेद देशपांडे यांनी तबलासाथ व ज्ञानेश्वर सोनवणे संवादिनीवर साथसंगत करून मैफलीची रंगत वाढवली.
गायनानंतर पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य पं. रूपक कुलकर्णी यांनी सोलो बासरीवादन केले. त्यांना संदीप आपटे यांनी बासरीवर, तर तबल्यावर तेजोवृष जोशी यांनी दमदार तबला साथ दिली. रूपक यांनी स्वर्गीय सुरावटीद्वारे श्रोत्यांना थेट वृंदावनात नेऊन सुरेल अनुभूती दिली. यावेळी पदाधिकारी व रसिक उपस्थित होते.
आज विविध कार्यक्रम
रविवारी (दि.२४) संध्याकाळी ५ वाजता सुजित काळे यांचे सोलो तबलावादन होणार आहे. त्यानंतर सुमुखी अथणी या कथक नृत्याविष्कार सादर करतील, तर महोत्सवाची सुरेल सांगता प्रा. डॉ. अविराज तायडे यांच्या बहारदार गानमैफलीने होईल. या संगीत महोत्सवाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.