समाजकल्याणचे कर्मचारी करणार ब्रह्मगिरी प्रदक्षिणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:58 AM2018-08-18T00:58:22+5:302018-08-18T00:58:53+5:30
दैनंदिन कामकाजातून विरंगळा म्हणून सहली करण्यापेक्षा गिर्यारोहण आणि पंढरपूरची वारी करण्याचा उपक्रम करणारे समाजकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी यंदाही ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण करणार आहेत.
नाशिक : दैनंदिन कामकाजातून विरंगळा म्हणून सहली करण्यापेक्षा गिर्यारोहण आणि पंढरपूरची वारी करण्याचा उपक्रम करणारे समाजकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी यंदाही ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण करणार आहेत. या मोहिमेत समाजकल्याण अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत. येत्या रविवारी या प्रदक्षिणेला सुरुवात होणार आहे. समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल हे समाज कल्याण विभागात कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मागील सात वर्षांपासून विविध उपक्रमांचे आयोजन करत आहेत. यापूर्वी पंढरपूरची वारी, नाशिक शहर व परिसरातील पर्वतराजीमध्ये शनिवार व रविवार ट्रॅकिंग, कळसूबाई शिखर, गिरणार पर्वतावर चढाई आदी उपक्रमाचे आयोजन केले आहे. समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी सन २०१२ पासून ‘ब्रह्मगिरी’ची प्रदक्षिणा करत आहेत. पहिल्या प्रदक्षिणेच्या वेळी २० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतर त्यात वाढ होऊन शंभर अधिकारी, कर्मचारी या वर्षीच्या प्रदक्षिणेत सहभागी होणार आहेत. रविवार, दि.१९ रोजी पहाटे पाच वाजता प्रदक्षिणेला सुरुवात होणार आहे. यासाठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. ६० महिला व पुरुष अधिकारी, कर्मचारी, २० किलोमीटरची लहान प्रदक्षिणा करणार आहेत. या मोहिमेत समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल, सहायक संचालक दीपक बिरारी, जात पडताळणी विभागाचे पोलीस उपअधीक्षक पुंडलिक सपकाळे, संशोधन अधिकारी, राकेश पाटील, विशेष अधिकारी देवीदास नांदगावकर, जळगावचे समाज कल्याण सहायक आयुक्त खुशाल गायकवाड, पोलीस निरीक्षक नंदराज पाटील, नीलेश गायकवाड, लेखाधिकारी विनोद खैरनार, सहायक लेखाधिकारी राजेश जोशी, समाज कल्याण निरीक्षक मनीषा गांगुर्डे, कार्यालय अधीक्षक श्रीमती अश्वनी मोरे, विधी अधिकारी संतोष सरकटे, जनसंपर्क अधिकारी सुरेश पाटील, समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र कांबळे, भागवत पाटील, अनिल तिदमे यांच्यासह शंभर अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहेत.