लाखो भाविकांची ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:25 PM2018-08-27T13:25:06+5:302018-08-27T13:25:23+5:30
त्र्यंबकेश्वर : बम बम भोलेचा जयघोष करीत लाखो भाविकांनी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारत श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारचे पुण्य पदरी पाडून घेतले.
त्र्यंबकेश्वर : बम बम भोलेचा जयघोष करीत लाखो भाविकांनी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारत श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारचे पुण्य पदरी पाडून घेतले. भर पावसात भाविकांनी प्रदक्षिणेसाठी गर्दी केली होती. पोलीस आणि प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सभामंडपात आमदार निर्मला गावित , जि.प.उपाध्यक्ष नयना गावित, विश्वस्त प्रशांत गायधनी, दिलीप तुंगार, अॅड.पंकज भुतडा, संतोष कदम, मुख्याधिकारी तथा विश्वस्त डॉ. चेतना मानुरे केरूरे आदींनी लघुरूद्र पुजा केली. त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. रविवारी सायंकाळापासूनच भाविकांनी त्र्यंबकला गर्दी केली होती. राज्याभरातून भाविकांच्या गर्दीचा ओघ सुरु असल्याचे दिसून आले. काही जण सायंकाळीच देवस्थानच्या खोल्यांमध्ये तसेच हॉटेलमध्ये मुक्कामासाठी दाखल झाले होते. राज्य परिवहन महामंडळाच्या पोलीस आणि नगरपालिका प्रशासनातर्फे भाविकांच्या सोयीसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. ‘त्र्यंबकेश्वर यात्रा’ असे स्टिकर लावलेल्या सर्व बसेसनी नाशिकहून थेट त्र्यंबकेश्वर बसस्थानकापर्यंत भाविकांना सेवा पुरविली. सर्व बसेसला बसस्थानकापर्यंत परवानगी देण्यात आली होती; मात्र नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाणाºया खासगी वाहनांना खंबाळेपासून पुढे बंदी घालण्यात आली होती. खंबाळेहून पुढे जाण्यासाठी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच मुंबई, घोटी-इगतपुरीकडून येणाºया वाहनांना पहिनेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. जव्हार-मोखाडामार्गे येणारी सर्व वाहने अंबोलीपर्यंत येत होती. खंबाळे, अंबोली, पहिने या गावांपासून पुढे केवळ महामंडळाच्या बसेसला त्र्यंबकेश्वरपर्यंत सोडले जात होते. पवित्र तिर्थराज कुशावर्तावर स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.