ब्रेक फेल शिवशाही वर्कशॉपमध्येच अनकंट्रोल, नाशिक आगारातील घटना
By संदीप भालेराव | Published: September 10, 2022 08:13 PM2022-09-10T20:13:37+5:302022-09-10T20:13:45+5:30
चौघे कर्मचारी थोडक्यात बचावले
ब्रेक फेल असलेली शिवशाही बस दुरूस्तीसाठी घेत असतांनाच वर्कशॉपमध्येच अनकंट्रोल झाली आणि बससमोर असलेले चार कर्मचारी थोडक्यात बचावले. गाडीच्या धडकेने बससमोरील गार्डस्टोनच्या ठिकऱ्या उडाल्याने तर पत्र्याचे बॅरिकेटींगही दूर फेकले केले. शनिवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे कर्मचाऱ्यांना धक्का बसला. दरम्यान, ब्रेक फेल बसचे स्टेअरिंग कुणाच्या हातात होते आणि त्यावर काय कारवाई होणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नाशिक विभाग एसटी महामंडळाच्या नाशिक आगार क्रमांक-१ येथे एमएच/०६/बीडब्लू/१००६ ही शिवशाही बस ब्रेक फेल झाल्याने दुरुस्तीसाठी आणण्यात आलेली आहे. बस रॅम्पवर असतांना येथील मॅकेनिकने बस दुरूस्तीसाठी पुढे घेण्याचा प्रयत्न केला असतांनाच बस अनकंट्रोल झाली आणि समोरील गार्डस्टोनवर आदळली. यावेळी बसच्या समोरच चार कर्मचाररी देखील होते मात्र ते वेळीच सावध झाल्याने बचावले.
या घटनेमुळे कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. वर्कशॉपमध्ये जेथे हा प्रकार घडला त्याच्या अगदी समोरच वर्कशॉप कर्मचाऱ्यांची रेस्ट रूम आहे. गाडीला वेग अधिक असतात तर कदाचित मोठी दुर्घटना घडली असती. हा सर्वप्रकार घडल्यानंतर डेपो मॅनेजर वगळता विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.