...थरथरत्या हातांवर खुलली मेंदी

By admin | Published: February 1, 2016 10:33 PM2016-02-01T22:33:30+5:302016-02-01T22:37:17+5:30

जगण्याची उमेद : राज्यातील दोनशेपेक्षा अधिक एचआयव्हीबाधित लग्नाच्या बेडीत

... Bramble with shaky hands | ...थरथरत्या हातांवर खुलली मेंदी

...थरथरत्या हातांवर खुलली मेंदी

Next

सतीश डोंगरे नाशिक
ऐन उमेदीच्या काळात नकळत गंभीर चूक झाली आणि एचआयव्हीचा विषाणू कायमस्वरूपी रक्तात भिनला. सुखी संसाराचे स्वप्न तर भंगलेच शिवाय रक्ताच्या नात्यानेही दूर सारले. आता उरले-सुरले आयुष्य एकाकी जगणे हा एकमेव पर्याय शिल्लक असलेल्या एचआयव्हीग्रस्तांच्या आयुष्यात यश फाउंडेशनने प्रापंचिक जीवनाचा मार्ग दाखविला. २००८ पासून राज्यभरातील दोनशेपेक्षा अधिक एचआयव्हीग्रस्तांना एकत्र आणून मरणाच्या भीतीने थरथरणाऱ्या हातावर मेंदी रंगविण्याचे काम केले. त्यातील २३ जोडपे सुखाने संसार करीत आहेत.
एचआयव्हीची लागण झाल्याने समाजाबरोबरच कुटुंबीयांनीदेखील एकप्रकारे बहिष्कृत केल्याने या तरुण-तरुणींपुढे उर्वरित जीवन एकाकीपणे व्यतित करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. अशात यश फाउंडेशनने २००८ साली ‘मंगल मैत्री’ मेळाव्याचे आयोजन केले. राज्यभरातील एचआयव्हीग्रस्त विधवा-विदूर व अविवाहित तरुण-तरुणींच्या भेटी घेऊन त्यांना या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. पहिल्या वर्षात हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. केवळ नाशिक, मुंबई, ठाणे या तीनच जिल्ह्यांतील विवाहेच्छुक तरुण-तरुणी मेळाव्यात सहभागी झाले.
२००९ मध्ये यात भर पडली. ४०पेक्षा अधिक विवाहेच्छुकांनी मेळाव्यात हजेरी लावली. पुढे २०१० मध्ये मेळाव्याच्या माध्यमातून पहिले लग्न लावण्यात फाउंडेशनला यश आले. त्यानंतर प्रत्येक वर्षी फाउंडेशनच्या माध्यमातून एचआयव्हीग्रस्तांच्या अंगणात सनई-चौघड्यांचे सूर घुमू लागले. २०१४ मध्ये राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांमधील एचआयव्ही बाधितांनी मेळाव्यात सहभागी होत आपला जोडीदार निवडला. पुढे याचे स्वरूप वाढत गेले. २०१५-१६ मध्ये तर राज्यातील कानाकोपऱ्यातील एचआयव्हीग्रस्तांनी मेळाव्यास हजेरी लावत आपला जोडीदार निवडला.
मेळाव्यात वधू-वरांनी एकमेकांना पसंत केल्यानंतर त्यांच्यातील नाते अधिक बळकट व्हावे यासाठी फाउंडेशनकडून प्रयत्न केले जातात. वधू आणि वरांकडूनही जन्म दाखला, एआरटी पुस्तकाची प्रत, एचआयव्ही निष्पन्न झाल्याचा पहिला रिपोर्ट, घटस्फोटीत असल्यास घटस्फोटाचे कागदपत्रे, साथीदाराचा मृत्यू दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे आदि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच लग्न लावले जाते.

Web Title: ... Bramble with shaky hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.