रस्त्यांच्या कामाचे पितळ उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:49 PM2020-01-10T22:49:23+5:302020-01-11T01:03:02+5:30
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे गाव शिवार, गावांना जोडणारे अंतर्गत तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वाट लागली असून, या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पाथरे : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे गाव शिवार, गावांना जोडणारे अंतर्गत तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वाट लागली असून, या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांनी अनेक वेळा समृद्धी महामार्गाचे काम घेतलेल्या ठेकेदारांना समज दिली आहे. यासंदर्भात राज्य रस्ते विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही तक्रार केली आहे. एकीकडे समृद्धी महामार्गामुळे राज्याचा विकास साधला जाणार आहे असे बोललं जातं आहे. त्यावर हजारो कोटी रुपये खर्च होत आहे, तर दुसरीकडे गावांना जोडणारे रस्ते खराब होत आहेत. त्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात गावांना जोडणाºया रस्त्यांची दुरदशा चर्चेचा विषय बनली आहे. ग्रामीण भागातील जनतेचा प्रवास हा खेडे गावाला जोडणाºया रस्त्यांमुळे होत असतो; परंतु सध्या या रस्त्यांचे हाल झाले आहे. शहरांना समृद्धीमुळे विकास होणार आहे तर खेडे मात्र विकासापासून दूर जात आहे असं तरी सध्या चित्र आहे. शेतकरी, ग्रामस्थ यांना पावसाळ्यात या रस्त्यांमुळे खूप त्रास सहन करावा लागला. उन्हाळ्यात अवजड वाहनांमुळे ुधुळीचा त्रास सहन करावा लागला. आता तर रस्ते अति खराब झाल्याने वाहने चालवणे अवघड होऊन बसले आहे. समृद्धी महामार्ग या रस्त्याची रुंदी चारशे फूट असून, त्यावर मातीचा भराव टाकण्यासाठी समृद्धी महामार्गाचे ठेकेदारांकडून शिवारअंतर्गत रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. २० ते २५ टनी डंपर वाहतुकीसाठी या रस्त्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे रस्त्यांची खडी उघडी पडून मोठमोठे खड्डे पडले आहे. नुकताच नव्याने डांबरीकरण करण्यात आलेल्या पाथरे ते शहा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. साधारण पणे तीन किलोमीटरच्या रस्त्याची सततच्या जड वाहनांमुळे खडी, डांबर, साईडपट्ट्या उखडून गेल्या आहे. ज्यादा क्षमतेच्या वाहतुकीमुळे शिवाररस्त्यांसह अन्य इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची देखील वाट लागली आहे. त्यात पाथरे ते बहादरवाडी, जवळके, सायाळे या रस्त्यांची पुरती वाताहत झाली आहे. या रस्त्यावर दुचाकी, अथवा चार चाकी वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे ठेकेदारांनी या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.