देवळाणे शिवारात धाडसी दरोडा
By admin | Published: September 6, 2015 11:01 PM2015-09-06T23:01:45+5:302015-09-06T23:02:40+5:30
देवळाणे शिवारात धाडसी दरोडा
द्याने : बागलाण तालुक्यातील रामतीर येथील शेतकरी बापू सजन अहिरे (४५) देवळाणे शिवारात वस्ती करून राहतात. त्यांच्याकडे काल रात्री दहा वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला असून, सुमारे ५० हजारांचा माल चोरट्यांनी चोरून नेला.
काल रात्री दहा वाजेच्या सुमारास तीन पुरुष व एका महिलेने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील लोकांना अचानक मारहाण सुरू केली. घरातील सामानाची व कपाटाची उलथापालथ करून सोन्याची माळ, अंगठी व रोख रक्कम असा एकूण ५० हजारांचा ऐवज चोरून नेला. अहिरे यांनी रस्त्यावर येऊन आरडाओरड केल्याने चोरटे पळून गेले. बापू अहिरे हे देवळाणे-रामतीर रस्त्यावर शेतात वस्ती करून पत्नी व दोन मुलांसह राहतात. काल रामतीर येथे कीर्तन असल्याने पत्नी व मुलगा तेथे गेले होते. दुसरा मुलगा त्याच्या पत्नीसह देवळाणे येथे गेला होता. अहिरे घरात टीव्ही पाहत असताना घरात घुसलेल्या चोरट्यांनी त्यांना मारहाण सुरू केली. कटरसारख्या धारदार शस्त्राने त्यांना जखमी केले. घरातील कपाट व सामानाची उलथापालथ करून चोरी करून पळून गेले. पोलीसपाटील सुरेश कुमावत यांनी जायखेडा पोलिसांना कळविले. परिसरातील ग्रामस्थांनी नाकाबंदी केली; मात्र चोरटे फरार झाले. सटाण्याचे पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी घटनास्थळी भेट देऊन सूचना दिल्या. चोरटे अहिराणी भाषेत बोलत होते. अहिरे यांना अधिक उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांनीही घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे रातीर, रामतीर, सुराणे, देवळाणे, सारदे, वायगाव भागात शेतात वस्ती करून राहणाऱ्या शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे.पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. अनोळखी व्यक्ती आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.