ब्राझील-कोलंबियात चुरस
By admin | Published: July 3, 2014 10:02 PM2014-07-03T22:02:20+5:302014-07-04T00:16:24+5:30
ब्राझील-कोलंबियात चुरस
२०व्या विश्वचषकाचे ४८ साखळी आणि त्यानंतरचे बाद फेरीचे ८ असे एकूण ५६ सामने पार पडले, आता केवळ शेवटचे ८ सामने बाकी आहेत. शेवटच्या क्लायमॅक्सच्या आठ सामन्यांच्या थराराला सुरुवात होत आहे. या विश्वचषकामध्ये सहभागी ३२ संघांपैकी आता केवळ आठ संघ या अंतिम चरणामध्ये दाखल झाले असून, या आठही संघांचा आत्तापर्यंतचा खेळ बघता कोणालाच कमी लेखता येणार नाही. यामध्ये चार माजी विश्वविजेते आहेत. या विश्वचषकामध्ये प्रथमच ज्या आठ संघांनी उपउपांत्य फेरी गाठली आहे तो प्रत्येक संघ हा आपापल्या गटामध्ये अव्वल राहिलेला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत नेदरलॅन्ड, कोलंबिया, अर्जेंटिना आणि बेल्जियम या चार संघांनी चारही सामने जिंकून १०० टक्के निर्भेळ यश मिळविले आहे, तर ब्राझील, फ्रान्स, जर्मनी आणि कोस्टारिका या चार संघांनी ४ पैकी ३ लढती जिंकल्या असून, एक लढतीत बरोबरी केलेली आहे. म्हणजेच या आठही संघांच्या नावावर अद्यापपर्यंत एकही पराभव लागलेला नाही. यावरून आता या आठ संघांमधील एकमेकांविरुद्धचा संघर्ष हा किती पराकोटीचा असणार आहे .
नेयमार - रॉड्रीगेसमध्ये गोलसाठी चुरस : ब्राझील आणि कोलंबिया या दोन संघांतील सामन्याने हा उपउपांत्य फेरीचा थरार सुरू होणार आहे. पुन्हा एकदा दोन दक्षिण अमेरिकन संघादरम्यान ही पहिली लढत होत आहे. या दोन्ही संघांचा आलेख बघता या दोघांमध्ये आत्तापर्यंत २५ वेळा सामना झालेला आहे आणि यामध्ये ब्राझीलने २५ सामन्यांत विजय मिळविलेला आहे. कोलंबियाला केवळ दोनच सामने जिंकता आलेले आहेत, तर आठ सामने अनिर्णित राहिलेले आहेत. तसेच विश्वचषकाचा विचार केल्यास सर्वच विश्वचषकामध्ये खेळणाऱ्या ब्राझीलच्या खात्यात पाच विश्वविजेतेपद आहेत. कोलंबियाची विश्वचषकातील ही केवळ ५वी वेळ असून, कोलंबियाला याआधी १९९० च्या विश्वचषकामध्ये एकदाच बाद फेरी गाठता आलेली आहे आणि तब्बल २८ वर्षांनंतर कोलंबियाला बाद फेरी गाठण्यात यश मिळालेले आहे. उपउपांत्य फेरीत दाखल होण्याची कोलंबियाची पहिलीच वेळ आहे. ही सर्व आकडेवारी बघता ब्राझीलचेच पारडे जड वाटत असले तरी कोलंबियाचा या विश्वचषकातील खेळ बघता ब्राझीलला आपल्या पूर्वइतिहासावर आणि आकडेवारीवर विसंबून न राहता आपली पूर्ण ताकद या सामन्यात झोकून द्यावी लागणार आहे. कोलंबियाचे जेम्स रॉड्रीगेझ, जॅक्सन मार्टीनेझ, अॅद्रियन रॉमोस, कार्लोस बाका ही सर्व आघाडी सांभाळणारी फौज चांगलीच फॉर्ममध्ये आहेत. या तुलनेत यजमान ब्राझीलची साखळीतील मेक्सिको विरुद्धची बरोबरी आणि उपउपांत्यपूर्व सामन्यातील चिलीविरुद्धच्याही सामन्यातील १२० मिनिटातील बरोबरी बघता ब्राझीलला आघाडीमध्ये फारशी चमक दाखवता आलेली नाही. साखळी स्पर्धेत नोंदविलेल्या सात गोलमध्ये एक पेनल्टीच आहे आणि उर्वरित सहा गोलपैकी ३ गोल व एक पेनल्टी असे ४ गोल एकट्या नेयमारने केलेले आहेत, तर फ्रेड, फर्नाडीनो आणि डेव्हिड लुईस यांनी प्रत्येकी १-१ गोल केलेला
आहे. कोलंबियाच्या तुलनेत ब्राझीलचा बचावही कमकुवत वाटतो. शिवाय ब्राझील-कोलंबिया हे एकाच खंडातील असल्यामुळे अनेक वेळा एकमेकांशी खेळत असल्यामुळे इतर संघांच्या तुलनेत ब्राझीलच्या या मोठ्या नावलौकिकाचा दबाव कोलंबियावर नसेल, उलटपक्षी यजमान असल्यामुळे घरच्या प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षांमुळे ब्राझीलवरच दबाव असणार आहे हे नक्कीच. या विश्वचषकातील ब्राझीलचा संघ हा केवळ नेयमारच्या भोवतीच फिरतो आहे आणि चिलीविरुद्धच्या सामन्यात त्याला व्यवस्थित मार्क केल्यामुळे चिलीला बरोबरी राखता आली. चिलीप्रमाणेच या सामन्यातही त्याच्यावर करडी नजर असणार आहे. त्यामुळे नेयमारने स्वत: गोल करण्याचा प्रयत्न करतानाच मेस्सीप्रमाणे काही वेळा आपल्या सहकाऱ्यांना चांगले पास देऊन कोलंबियाच्या बचावफळीचा छेद करावा लागणार आहे. कोलंबियाचा स्टार जेम्स रॉड्रीगेसने प्रत्येक सामन्यात गोल करत खेळात सातत्य राखत आपली गोल करण्याची क्षमता दाखवून दिलेली आहे. त्याचा उरुग्वेविरुद्धच्या गेल्या सामन्यातील पहिला गोल तर अफलातून होता. त्यामुळे त्याला काबूत ठेवण्यासाठीही ब्राझीलचे बचावपटू कर्णधार थीअेगो सिल्व्हा, डॅनी अल्वेस आणि विशेषत: डेव्हिड लुईस यांना डोळ्यात तेल घालून पहारा करावा लागणार आहे. आत्तापर्यंत पाच गोलची आघाडी घेणारा रॉड्रीगेस आणि ४ गोलवर असणारा नेयमार या १० नंबरची जर्सी घालणाऱ्या या दोन खेळाडूतील गोल्डन बुटाची शर्यतही या सामन्याचा केंद्रबिंदू असणार आहे. त्यामुळे या दोन दक्षिण अमेरिकनांची निकराची झुंज कोण जिंकतो याची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे मात्र निश्चित.
नेदरलॅन्ड-कोस्टारिकामध्ये आॅरेंजआर्मीचे पारडे जड :- या स्पर्धेतील दुसरा सामना नेदरलॅन्ड आणि कोस्टारिका यांच्यात होत आहे. नेदरलॅन्डचा या विश्वचषकातील धडाका बघता आत्तापर्यंत तीनवेळा फायनलमध्ये शिकस्त करूनही हाती न लागलेले विश्वविजेतेपद यावेळी ताब्यात घेऊनच ही आॅरेज आर्मी दम घेईल असेच वाटते आहे. कर्णधार रॉबिन व्हॅन पर्सी, अर्जेन रॉबेन आणि वेलस्ली स्नायडर हे जगातील सर्वोत्तम खेळाडू त्यांच्या भात्यात असून, या सर्वांचा फॉर्मही चांगला आहे. या तुलनेत साखळीमध्ये ग्रुप आॅफ डेथ समजल्या जाणाऱ्या गटातून ज्या संघाचा गटात शेवटचा ४था क्रमांक लागेल असे म्हटले जात होते त्या ३४ रँकिंग असणाऱ्या कोस्टारिकाने उरुग्वे, इंग्लंड आणि इटली या माजी विश्वविजेत्यांवर मात करून गटात पहिला क्रमांक मिळवला, तर उपउपांत्यपूर्व फेरीतही १-१ बरोबरीनंतर सामना पेनल्टीमध्ये गेल्यानंतर त्याच्या कर्णधार ब्रायन रुईझ, जोएल क्म्पबेल, गोन्झालेस, सेल्सो बोर्गास, मार्को युरेना या पाचही खेळाडूंनी संयमाने पेनल्टीचे गोल करून संघाला प्रथमच पहिल्या आठमध्ये पोहचवलेले आहे. म्हणूनच या उत्तर अमेरिकेच्या संघाने आत्तापर्यंत जो खेळ पेश करून सर्वांनाच जे सरप्राईज केले आहे तसेच आणखी एक सरप्राईज देण्याच्या इराद्यानेच त्यांचे खेळाडू खेळतील यात शंकाच नाही. त्यामुळे हा सामनाही अत्यंत उत्कंठावर्धक होईल यात शंकाच नाही.