चालु महिन्यात खा रेशनच्या मक्याची रोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 05:42 PM2017-12-01T17:42:45+5:302017-12-01T17:45:57+5:30
नाशिक जिल्ह्यात मका पिकविला जात असला तरी, नैसर्गिक व भौगोलिक विचार करता मका खाल्ला जात नाही, शिवाय आदिवासी भागातील जनतेचे भात व नागली हेच प्रमुख अन्न आहे अशा परिस्थितीत रेशनमधून दिला जाणारा मका शिधापत्रिकाधारक घेतील काय याविषयी पुरवठा खातेच साशंक आहे, मात्र ते काहीही असले तरी, चालू महिन्यात शासनाने सांगितल्याप्रमाणे सर्वांना मक्याची रोटी खाण्याशिवाया पर्यायच शिल्लक नाही.
नाशिक : धान्य गुदामामध्ये गेल्या वर्षभरापासून पडून असलेला मका खपविण्यासाठी अन्न व पुरवठा मंत्रालयाने डिसेंबर महिन्यात रेशनमधून दिल्या जाणा-या गव्हात कपात करून त्याऐवजी मका विक्री करण्याची सक्ती रेशन दुकानदारांवर केली असून, पुरवठा खात्याने दुकानदारांना चलन भरण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे चालू महिन्यात गोरगरिबांना शासन कृपेने मक्याची रोटी खावी लागणार आहे.
गेल्या वर्षी राज्य सरकारने आधारभुत किंमतीत राज्यातील विविध भागातून मक्याची खरेदी केली होती. त्यासाठी मका उत्पादकांना १३६५ रूपये प्रति क्विंटल दर देण्यात आल्याने एकट्या नाशिक जिल्ह्यातून ३८ हजार क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली. हा मका सध्या काही ठिकाणी शा सकीय गुदामांमध्ये तर काही ठिकाणी खासगी गुदामे भाड्याने घेऊन ठेवण्यात आला आहे. वर्षभरापासून पडून असलेल्या मक्याची गुणवत्ता व दर्जा खराब होऊ लागला असून, काही ठिकाणी कीड लागण्याच्या घटना घडत असल्याने त्याच बरोबर यंदाही पुन्हा शासन आधारभुत किंमतीत मका खरेदी करणार असल्याने या मक्याच्या साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत गेल्या वर्षी खरेदी केलेला मका रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. एक रूपये किलो दराने हा मका देण्यात येणार असून, शिधापत्रिकाधारकांना तो सक्तीने घ्यावा लागणार आहे. त्यासाठी त्यांना दिल्या जाणा-या गव्हामध्ये कपात करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा कायद्यान्वये प्राधान्य कुटुंबांना प्रत्येक पाच किलो धान्य दिले जाते, त्यात आता एक किलो मका दिला जाईल तर अंत्योदय व अन्नपुर्णा योजनेत मिळणा-या ३५ किलो धान्यापैकी चार किलो मका घ्यावा लागणार आहे.