देवगांव परिसरात जनावरांच्या लसीकरणाला ब्रेक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:13 AM2021-08-01T04:13:49+5:302021-08-01T04:13:49+5:30
देवगांव : ऐन पावसाळ्यात पशुधन कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे देवगांव परिसरातील पशुधनाचे लसीकरण खोळंबले असून पशुपालकांमध्ये चिंतेचे ढग ...
देवगांव : ऐन पावसाळ्यात पशुधन कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे देवगांव परिसरातील पशुधनाचे लसीकरण खोळंबले असून पशुपालकांमध्ये चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. पावसाळापूर्व जनावरांना फऱ्या व घटसर्प या साथीच्या आजारांवर दरवर्षी लसीकरण केले जाते. मात्र, फऱ्या व घटसर्प रोगांवर उपायकारक लसीचा साठा आला नसल्याने देवगांव परिसरातील जनावरांचे लसीकरण लांबले आहे.
जनावरांना घटसर्प, फऱ्या, पायलाग यासारखे संसर्गजन्य आजार होतात. दमट वातावरणात घटसर्पसारखे श्वसनाचे आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. या आजारात जनावरांच्या छातीत पाणी होते. खालच्या जबड्याखाली सूज येते. श्वासोच्छवास करायला त्रास होतो. जनावराला १०४ ते १०५ अंश फॅरेनहाईट ताप येतो. संसर्ग झालेल्या जनावरांपैकी ९० टक्के जनावरे मृत्युमुखी पडतात. फऱ्या हा जनावरांना, प्राण्यांना तसेच विशेषत: दुधाळ जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग असून सांसर्गिकजन्य रोग आहे. विशेषकरून धष्टपुष्ट जनावरांना व २-३ वर्षे वयाच्या लहान जनावरांना होतो. हा रोग ‘क्लोस्टिडियम शोव्हिया’ या विषाणूंमुळे होतो.
साधारणतः पावसाळ्याच्या सुरुवातीला जनावरांना फऱ्या व घटसर्प आजारांवर लसीकरण केले जाते. वर्षातून दोनदा लसीकरण करणे गरजेचे असते. मात्र, पशुसंवर्धन विभागाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी जून महिन्याच्या दरम्यान या आजारांवर लसीकरण करण्यात आले होते. त्यानंतर यावर्षी कुठल्याही प्रकारचे लसीकरण न झाल्याने जनावरांमध्ये फऱ्या व घटसर्प आजाराचा संसर्ग वाढून जनावरांमध्ये फऱ्या आणि घटसर्प आजाराची लागण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी लसीकरण करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे काम असून वेळेवर लसीकरण करण्याची मागणी पशुपालक करीत आहेत.
--------------------
पशुवैद्यकीय सेवा वाऱ्यावर...
त्र्यंबकेश्वर तालुक्यात डहाळेवाडी व देवगांव येथे पशुसंवर्धन विभागाचे दवाखाने आहेत. मात्र, या दोन्ही दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रात एकमेव पशुधन अधिकारी आहे. एकाच डॉक्टरांकडे अतिरिक्त भार असल्यामुळे दोन्ही कार्यक्षेत्रावर लक्ष देण्यावर तारांबळ उडते. परिणामी पशुधन डॉक्टरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांवर वेळेवर उपचाराअभावी जनावरे दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे देवगांव परिसरासाठी एक वेगळ्या पशुधन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
▪️त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जनावरांची एकूण आकडेवारी...
शेळ्या -मेंढ्या | १७३२३
बैल-गाई | ४२६४०
म्हशी-रेडे | १०१२७
---------------------
प्रतिक्रिया...
जनावरांना डिसेंबर महिन्यामध्ये लस देण्यात आली आहे. मात्र, मे महिन्यात होणाऱ्या लसीकरणासाठी लस अजून उपलब्ध झाली नसल्याने लसीकरण थांबले आहे. फऱ्या व घटसर्प आजारांवरील लस उपलब्ध होताच लगेचच जनावरांना लसीकरण करण्यात येईल.
- डॉ. विजय भोये, पशुधन पर्यवेक्षक, देवगांव.