घरफोडीच्या खटल्याचा एका दिवसात निकाल़़़

By admin | Published: January 24, 2017 12:39 AM2017-01-24T00:39:58+5:302017-01-24T00:40:12+5:30

शुभवर्तमान : जलदगती न्याय; गुन्हेगार सराईत घरफोड्या; मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय

Break the burglary case in one day | घरफोडीच्या खटल्याचा एका दिवसात निकाल़़़

घरफोडीच्या खटल्याचा एका दिवसात निकाल़़़

Next

नाशिक : ‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’असे म्हटले जाते, यामागे बहुधा न्यायदानास होणारा विलंब कारणीभूत असावा़ मात्र; न्यायालयांनी आता पूर्वीच्या पद्धतीत अमूलाग्र बदल करून जलदगती न्यायदानास प्रारंभ केला आहे़ नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी एस़ एम़ बुक्के यांनी सोमवारी (दि़२३) एकाच दिवसात इंदिरानगरमधील घरफोडीच्या गुन्ह्यातील एका खटल्यात सर्व साक्षीदार तपासून सराईत घरफोड्यास शिक्षा सुनावली आहे़ नाशिक न्यायालयातील हा पहिलाच जलदगती न्याय असल्याचे सांगितले जाते आहे़  या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, २९ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील पूजा एंटरप्रायजेस या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील १३ हजार ४५० रुपयांची चोरी करण्यात आली होती़ ही चोरी करताना वडाळा गावातील सराईत घरफोड्या तथा तडीपार विशाल वसंत बंदरे ऊर्फ इंद्या यास रंगेहाथ पकडण्यात आले होते़, तर त्याचा फरार साथीदार शरद अशोक कांबळे यास इंदिरानगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत त्याच्या घरातून अटक केली़ यामध्ये कांबळेला दोन दिवसांनी जामीन मिळाला, तर इंद्या तेव्हापासून कारागृहात आहे़ पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये १२ जानेवारी रोजी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते़  मुख्य न्यायदंडाधिकारी बुक्के यांनी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास या खटल्यातील साक्षीदारांचा जबाब घेण्यास प्रारंभ केला़ सरकारी वकील स्वाती दांडेकर यांनी या खटल्यातील सातही साक्षीदारांच्या साक्ष पूर्ण करून इंद्या व कांबळेविरुद्ध सबळ पुरावे सादर केले, तर बचावपक्षाचे वकील ए़ के.काळे यांनी इंदिरानगरचे सहायक पोलीस निरीक्षक तथा तपासी अधिकारी संदीप वऱ्हाडे यांची दीड तास उलटतपासणी घेतली़ वऱ्हाडे यांनी इंद्या हा सराईत गुन्हेगार असून, तडीपार असताना त्याने शहरात दाखल होऊन गुन्हा केल्याची साक्ष दिली़ या खटल्यात समोर आलेल्या साक्षी पुराव्यानुसार मुख्य न्यायदंडाधिकारी बुक्के यांनी आरोपी विशाल बंदरे ऊर्फ इंद्या व अशोक कांबळे या दोघांनाही दोषी ठरवून सायकाळी ६ वाजता तीन महिने सक्तमजुरी व शंभर रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली़ (प्रतिनिधी)

Web Title: Break the burglary case in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.