रेल्वेस्थानकातील सुविधांना ‘ब्रेक’ !

By admin | Published: December 22, 2015 09:30 PM2015-12-22T21:30:41+5:302015-12-22T21:31:14+5:30

येवल्यात मोेजक्याच गाड्यांना थांबा : सर्वाधिक उत्पन्न असूनही प्रवासी गैरसोयीने त्रस्त

'Break' facility at railway station! | रेल्वेस्थानकातील सुविधांना ‘ब्रेक’ !

रेल्वेस्थानकातील सुविधांना ‘ब्रेक’ !

Next

येवला : अनेकवेळा निवेदने दिली गेली, आंदोलने झाली तरीही येवला रेल्वेस्थानकात फरक पडला नाही. येवला रेल्वेस्थानकाला ‘अच्छे दिन’ येतील अशी अपेक्षा होती, पण तीदेखील फोल ठरली आहे. ‘धीरेसे चलो’ म्हणवली जाणारी सवारी (पॅसेंजर) आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस अशा चार गाड्या वगळता कोणत्याही गाडीला येवला येथे थांबा नाही. अशा अनेक प्रकारच्या गैरसोयींमुळे रेल्वेप्रवासी त्रस्त झाले आहेत.
स्टेशनवर पिण्यासाठी पाणी नाही, बसण्यासाठी बाके नाहीत अशा एक ना अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या येवला रेल्वेस्थानकाकडे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. केंद्राच्या अखत्यारीत असलेला हा प्रश्न मार्गी लावावा आणि रेल्वे प्रवाशांना किमान सुविधा तरी द्याव्यात, अशी धारणा शहरवासीयांची आहे. या स्थानकावर सुरक्षारक्षकच नसल्याने सुरक्षेचा पत्ताच नाही. आओ जाओ स्टेशन तुम्हारा अशी अवस्था झाली आहे. मध्य रेल्वेच्या मनमाड-दौंड या लोहमार्गावर २४ तासात ३० रेल्वेगाड्यांच्या ६० फेऱ्या होतात. बऱ्याच गाड्या आठवड्यातून सात दिवस आवागमन करतात. काही सुपर गाड्या विशिष्ट दिवशी धावतात. यापैकी नांदेड-मनमाड-दौंड पॅसेंजर, नांदेड-निजामाबाद-मनमाड-दौंड-पुणे पॅसेंजर, मनमाड-दौंड—पुणे पॅसेंजर या तीन पॅसेंजर गाड्या व गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस अशा एकूण चार गाड्यांच्या आठ फेऱ्या होतात. केवळ याच चार गाड्या येवला रेल्वेस्थानकावर थांबतात.
उर्वरित सर्वच एक्स्प्रेस, सुपरएक्स्प्रेस अशा २६ रेल्वेगाड्या या स्थानकावरून टाटा करून निघून जातात. यांना थांबा नाही. वारंवार मागणी करूनही गाड्यांना थांबा मिळत नाही. येवला येथून पुणे येथे जाण्यासाठी सोयीची असलेली झेलम एक्स्प्रेस, शिवाय गोवा कर्नाटक एक्स्प्रेस या गाड्यांना येवल्यात थांबा नाही. या गाड्यातून प्रवास करावयाचा झाल्यास मनमाड जंक्शन अथवा कोपरगावला जावे लागते. या गाड्यांना थांबा द्यावा अशी अनेक दिवसांची मागणी आहे. गेल्या १२ वर्षांपासूनच्या प्रतीक्षेत राजा हरिश्चंद्र येतील आणि आमचा रेल्वेचा वनवास संपवतील व आमची हाक ऐकतील, अशा आशेवर केवळ येवलेकर आहेत. उत्पन्न कोटींचे, पण सुविधा नाहीत
येवल्यातून मोठा कांदा व्यापार होतो. डिसेंबर ते मार्चदरम्यान तर किमान ६० ते ७० रॅकमधून कांदा परराज्यात पाठवला जातो. शिवाय अन्य भुसार मालदेखील रेल्वेद्वारे पाठवला जातो. किमान दहा कोटी रुपये वर्षभराचे उत्पन्न, शिवाय प्रवाशांकडून भाड्यापोटी मिळणारे उत्पन्न असा उत्पन्नाचा मोठा स्रोत असताना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही. यासाठी मतदारसंघाचे खासदार यांनी रेल्वे मंत्रालयाकडून येवल्यासाठी काही ठोस आणावे अशी मागणी आहे. सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या येवला रेल्वेस्थानकाला अच्छे दिन येतील अशी अपेक्षा आहे. आणि ती जबाबदारी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुर्लक्षित येवला रेल्वेस्थानकाचे रूप बदलावे, अशी येवलेकरांची अपेक्षा आहे. (वार्ताहर)

समस्यांच्या विळख्यात स्थानक परिसर
रेल्वेसेवा असून नसल्यासारखी आहे. येवला रेल्वेस्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी बाके नाहीत. प्रतीक्षालय कायमस्वरूपी बंद असते. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. केवळ एक प्लॅटफॉर्म आहे. त्यावर कुठल्याही प्रकारचे डांबरीकरण अथवा कॉँक्रि टीकरण नाही. अशा परिस्थितीत ओव्हरब्रिज हे तर दिवास्वप्नच आहे.
प्रसाधनगृहाची अवस्था वाईट आहे. कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा या स्थानकात नाहीत. रात्नीच्या वेळी तर अंधाराचे साम्राज्य असते. येथील सुरक्षाव्यवस्था रामभरोसे आहे. रेल्वे पोलीस नाहीत. रात्नीच्या प्रवासावेळी आपल्या अंगबळाच्या सार्मथ्यावर या स्थानकात यावे आणि मगच प्रवास करावा अशीच काहीशी परिस्थिती आहे.
रेल्वेस्थानकात फोन सुविधा नसल्याने स्थानिक नागरिकांना रेल्वेशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधता येत नाही. स्थानिक नागरिकांनी गांधीगिरीच्या आंदोलनातून रेल्वेला भेट दिलेला फोनदेखील अडगळीला पडला आहे. आरक्षण आणि सर्वसाधारण तिकिटांसाठी केवळ एकच खिडकी आहे. त्यामुळे आरक्षणासाठी अधिक वेळ लागतो.

लगेज करावयाचे झाल्यास रेल्वेला भाडे चुकते करायचे, पावती घ्यायची व आपले सामान आपणच बोगीत चढवायचे. त्या लगेजवर मार्किंग करण्यासाठी पेनदेखील प्रवाशांनीच आणायचा असा नवा नियमदेखील या स्थानकात अवलंबला जाण्याचा अनुभव प्रवाशी घेत आहेत.

Web Title: 'Break' facility at railway station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.