प्रवासी नसल्याने एसटी बसेसच्या चाकांना ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:15 AM2021-04-09T04:15:09+5:302021-04-09T04:15:09+5:30
नाशिक: कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लोक प्रवास करणे टाळत आहेतच शिवाय जिल्हा निर्बंधामुळे बाजारपेठा आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरही परिणाम ...
नाशिक: कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लोक प्रवास करणे टाळत आहेतच शिवाय जिल्हा निर्बंधामुळे बाजारपेठा आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरही परिणाम जाणवू लागल्याने त्याचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाला आहे. प्रवासी नसल्याने अनेक मार्गांवरील बसफेऱ्या कमी करण्याची वेळदेखील महामंडळावर आली आहे.
मागील वर्षी काेरोना संकटाच्या काळात सुमारे आठ महिने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनचाही प्रसंग निर्माण झाला होता. त्यावेळी राज्य सरकारला विशेष पॅकेज देण्याची वेळ आली होती. यावर्षी बसेस सुरू करण्याला परवानगी देण्यात आल्यानंतर एसटी रुळावर येत असतानाच पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बाजारपेठा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत, शासकीय कार्यालयांची उपस्थिती ५० टक्के करण्यात आली आहे तर खासगी कार्यालये पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली असून प्रवासी संख्या कमी झाली आहे.
--इन्फो--
गेले वर्षही तोट्याचे
मागील वर्षी महामंडळाच्या बसेस जवळपास आठ ते नऊ महिने बसस्थानकातच उभ्या होत्या. जिल्ह्यांतर्गत तसेच परजिल्ह्यातील बसेसदेखील बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे महामंडळाचे उत्पन्न पूर्णपणे थांबले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न निर्माण झाला होता. अत्यावश्यक सेवेसाठीच्या बसेस केवळ सेवाभावी म्हणून सुरू होत्या. मात्र त्यातून काही उत्पन्न मिळत नव्हते. नाशिक विभागाला दरमहा ३२ कोटींचा तोटा सहन करावा लागला.
--इन्फो--
२०५ बसेस पुन्हा बंद
यावर्षी बसेस चालविण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर जिल्ह्यात ८३२ पैकी टप्प्याटप्प्याने ६६७ बसेस सुरू करण्यात आल्या. या माध्यमातून जिल्ह्यातील बससेवाला बुस्ट मिळाला असतानाचा अवघ्या तीन महिन्यात पुन्हा निर्बंधामुळे महामंडळाला बसेस कमी करण्याची वेळ आली आहे. प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे सद्यस्थितीत केवळ २२५ बसेस चालविल्या जात आहेत. त्यातही तालुक्याच्या गावी येणाऱ्या बसेसची प्रवासी संख्या ३० टक्क्याने कमी झाली आहे.
--इन्फो--
उत्पन्न ५० टक्क्याने घटले
जिल्ह्यात यापूर्वी किमान ६०० बसेस सुरू असल्यामुळे महामंडळाचा आर्थिक गाडा सुरळीत सुरू होता. जसजशी प्रवासी संख्या वाढत गेली तसतसे उत्पन्नही वाढत गेल्याने ६० लाखांवरील हजारांवरील उत्पन्न ८० लाखांपर्यंत पोहोचले असताना निर्बंधाचा ब्रेक लागला. आता उत्पन्न २५ ते ३० लाखांच्या जवळपास आले आहे. इतका मोठा फटका बसल्याने जिल्ह्यातील अनेक बसेस बंद होण्याच्या मार्गावर आहेत.