बालकाची हत्या करणाऱ्या आरोपीच्या घराची मोडतोड
By Admin | Published: July 8, 2017 12:14 AM2017-07-08T00:14:14+5:302017-07-08T00:14:31+5:30
पिंपळगाव बसवंत : बालकाची हत्या करणाऱ्या आरोपीच्या घराची जमावाने शुक्रवारी मोडतोड केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव बसवंत : पाचवर्षीय बालकाची हत्या करणाऱ्या संशयित आरोपीच्या इस्लामपुरा भागातील घराची जमावाने शुक्रवारी मोडतोड केली.
पिंपळगाव बसवंत येथे गेल्या २५ जून रोजी साहिल दादू पिंजारी या पाचवर्षीय बालकाची भिकन निजर पिंजारी याने हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी भिकन व त्याची आई अमिना पिंजारी यांना पोलिसांनी अटक केली असून, सध्या ते तुरूंगात आहेत. सदर आरोपीचे व बहिणीचे इस्लामपुरा भागात घर आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पाऊस सुरु असताना शंभर ते दीडशे जणांच्या जमावाने या घराची मोडतोड केली. संशयित आरोपी भिकन पिंजारी याची बहीण शकिला पिंजारी ही शेजारीच दोन मजली घरात राहत होती. या प्रकरणी तिलासुद्धा आरोपी केले होते मात्र तिचा या प्रकरणाशी कुठल्याही संबंध नसल्याने पोलिसांनी शकिलाला का सोडले याचा राग नागरिकांना होता. या परीसरात आरोपी भिकन च्या कुठल्याही नातेवाईक राहु न देण्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला व दुपारी पंधरा ते वीस मिनीटात तीनही घरांची मोडतोड केली.
पोलीस निरीक्षक वासुदेव देसले पोलीस ताफा घेऊन येताच सर्व जण पसार झाले. या ठिकाणी नेमलेला विषेश पोलीस बंदोबस्त काढन्यात आल्यानंतर हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.