दिंडोरीजवळील न्याहरी मातेच्या डोंगराला लागला वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 01:39 AM2022-05-30T01:39:21+5:302022-05-30T01:40:03+5:30
जिल्ह्यातील वन परिसरात डोंगरांना वणवा लागण्याच्या घटनांचे सत्र काही थांबत नाही. रोज वेगवेगळ्या ठिकाणी वणव्यांच्या घटना बघायला मिळत आहे. शनिवार दिनांक २८ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास दिंडोरीजवळील वनपरिक्षेत्रात असलेल्या न्याहरी माता डोंगराला अज्ञात इसमाकडून आग लावण्यात आली.
दिंडोरी : जिल्ह्यातील वन परिसरात डोंगरांना वणवा लागण्याच्या घटनांचे सत्र काही थांबत नाही. रोज वेगवेगळ्या ठिकाणी वणव्यांच्या घटना बघायला मिळत आहे. शनिवार दिनांक २८ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास दिंडोरीजवळील वनपरिक्षेत्रात असलेल्या न्याहरी माता डोंगराला अज्ञात इसमाकडून आग लावण्यात आली.
मागील पाच-सहा वर्षांपासून स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्था या डोंगराच्या परिसरात वृक्षारोपण व संगोपनाचे काम करते. त्या परिसरातील वणवा लागल्याचे नजरेस पडलेल्या नागरिकांनी संस्थेतील सदस्यांना फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच संस्थेचे सदस्य तत्काळ घटनास्थळी धावले. बरोबर आणलेल्या ओल्या बारदानांनी आग विझविण्यासाठी सरसावले. कडक ऊन, वाऱ्याचा वेग व वाढलेल्या गवतामुळे ज्वाळांचा मोठा लोळ उठत होता, तरीही मोठ्या जिद्दीने कडेकपारीत व निसरड्या जागेत घुसून मोठ्या शिताफीने वणवा विझवण्यात आला. तापलेली जमीन, मोठ्या प्रमाणातील धूर यामुळे त्यांचा जीव कासावीस झाला होता, तरीही काम पूर्ण होईपर्यंत कुणीच थांबले नाही.
वनविभागालाही वणव्याची माहिती मिळताच वनपाल अशोक काळे यांनीही घटनास्थळी धाव घेत काम केले. त्यानंतर घटनेची पाहणी करून झालेल्या वन व जीवितहानीची पाहणी करीत नोंद करून सहभागी युवकांचे व त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली.
भाऊसाहेब चव्हाणके, प्रवीण भेरे, प्रवीण घोलप, सजन फलाने, अमोल शिरसाठ, रोशन संधान,जगदीश गायकर, विक्रम गायकवाड, चिंधू वागले, खुशी खासाडे, कल्पना वागले आदींनी वणवा विझविण्यासाठी प्रयत्न केले.