विल्होळीच्या तलावाला मोठे भगदाड
By श्याम बागुल | Published: September 9, 2018 04:47 PM2018-09-09T16:47:11+5:302018-09-09T16:49:11+5:30
नाशिक : विल्होळी गावाला तसेच परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या तलावाच्या खिंडीला मोठे भगदाड पडले, त्यातून गेल्या काही दिवसांपासून पाणी वाया जात आहे. या तलावाची तत्काळ डागडुजी केली नाही तर उन्हाळ्यात विल्होळी व परिसरातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार आहे.
गावालगत असलेल्या या तलावातून वर्षभर आजूबाजूच्या शेतजमिनीला तसेच गावाला पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. तलाव अनेक वर्षे जुना असून, तो बांधल्यापासून त्याची देखभाल, दुरुस्ती करण्यात आलेली नाही. अलीकडेच पावसाळ्यामुळे या तलावात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने या तलाव्याच्या खिंडीला मोठे भगदाड पडले असून, आजूबाजूलाही खड्डे पडून पाण्याची गळती सुरू झाल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. तलावातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याने ग्रामस्थांनी या संदर्भात पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांना कळविले असून, लवकरात लवकर तलावाची गळती थांबवावी अन्यथा तलावातील सर्व पाणी संपेल व ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांनी तलावाची पाहणी केली असून, त्याचे फोटो काढण्यात आले आहेत. परंतु अद्यापही कामास सुरुवात झाली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.