लाचखोर महिला लिपिकास रंगेहाथ पकडले
By admin | Published: February 3, 2017 01:18 AM2017-02-03T01:18:47+5:302017-02-03T01:19:02+5:30
आडगाव : ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय; सेवानिवृत्ती वेतनासाठी लाचेची मागणी
नाशिक : सेवानिवृत्त पोलीस हवालदाराचा मुंबईला पाठविलेला चुकीचा बडतर्फीचा अहवाल दुरुस्त करण्यासाठी साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ महिला लिपिक संशयित माधुरी विठ्ठल कुलकर्णी (५२, रा़ रघुकुल, राजसारथी सोसायटी, इंदिरानगर) यांना रंगेहाथ पकडण्यात आले़
लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातील पोलीस निरीक्षक डी़ टी़ धोंडे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ग्रामीण पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस हवालदार नारायण जगन्नाथ पवार यांची सेवानिवृत्तीबाबत अडचण असल्याने त्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली होती़ पवार यांना सेवानिवृत्ती वेतनाचा पूर्ण लाभ देण्यासाठी तसेच मुंबई येथील जीपीएफच्या कार्यालयात पाठविलेला बडतर्फीचा चुकीचा अहवाल दुरुस्त करण्यासाठी कुलकर्णी यांनी त्यांच्या हस्ताक्षरात एका कागदावर पाकिटात घालून तीन हजार ५०० रुपये असा मजकूर लिहून लाचेची मागणी केली़ याबाबत पवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ या तक्रारीनुसार सापळा रचण्यात आला होता़ तक्रारदाराने अर्थोसिल पावडर लावलेल्या ५०० रुपये दराच्या सात नोटा पाकिटात घालून सदर पाकीट एका फाईलमध्ये ठेवले़ दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास ही फाईल ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात कुलकर्णी यांनी स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले़ (प्रतिनिधी)