लाचखोर पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:19 AM2019-12-10T00:19:04+5:302019-12-10T00:19:39+5:30
पोलीस ठाण्यातच तक्रारदाराकडून थेट लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना लागोपाठ रंगेहाथ सापडलेल्या शहर व ग्रामीण पोलीस दलातील दोघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व एका उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक : पोलीस ठाण्यातच तक्रारदाराकडून थेट लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना लागोपाठ रंगेहाथ सापडलेल्या शहर व ग्रामीण पोलीस दलातील दोघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व एका उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, या लाचखोर त्रिकुटांना सोमवारी (दि.९) जिल्ह्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संशयित विलास जाधव यास न्यायालयीन कोठडी सुनावली, तसेच नानासाहेब नागदरे, सुभाष देवरे यांच्या पोलीस क ोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली.
नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागदरे व देवरे यांनी तक्रारदाराकडून गुरुवारी (दि.५) पोलीस ठाण्यातच २२ हजार रु पयांची लाच स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने या दोघांना पुन्हा न्यायालयात हजर केले असतान न्यायालयाने कोठडीत एक दिवस वाढवून दिला. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दोघा लाचखोर अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करत अन्य पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनाही तंबी दिली आहे. तसेच सातपूरचे लाचखोर पोलीस निरीक्षक संशयित जाधव यांनाही शुक्रवारी (दि.६) लाचेची ५० हजारांची रोख रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.९) पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. जाधव यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस दलाच्या प्रतिमेला ‘डाग’
पोलिसांनी लाचखोरी करणे हे काही नवीन नाही; मात्र सलग दोन दिवस थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि एक पीएसआय लाचेची रक्कम घेत सापळ्यात अडकल्याने शहर व ग्रामीण पोलीस दलाची प्रतिमा डागाळली. लाचखोरीला आळा घालण्यासाठी या दोन्ही दलांच्या पोलीस प्रमुखांना कठोर भूमिका आगामी काळात घ्यावी लागणार आहे. या तिघांच्या लाचखोरीने अवघ्या पोलीस दलाकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होण्यास मदत झाल्याचे बोलले जात आहे.