लाचखोर पोलीस शिपाई लोंढेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 01:10 AM2018-11-14T01:10:27+5:302018-11-14T01:11:04+5:30
पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदाराचे नाव न घेण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करून पाच हजार रुपयांची लाचेची रक्कम घेणारा मुंबई नाका पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई संशयित योगेश शंकर लोंढे (बक्कल नंबर २५२२) यास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़१३) सापळा रचून रंगेहाथ अटक केली़
नाशिक : पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदाराचे नाव न घेण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करून पाच हजार रुपयांची लाचेची रक्कम घेणारा मुंबई नाका पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई संशयित योगेश शंकर लोंढे (बक्कल नंबर २५२२) यास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़१३) सापळा रचून रंगेहाथ अटक केली़ लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक विश्वजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या मित्राविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यात तक्रारदार यांचे नाव न घेण्यासाठी तसेच त्यास वाचविण्यासाठी संशयित योगेश लोंढे याने १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली असता पडताळणी करून मंगळवारी मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोर सापळा रचला होता़ त्यानुसार संशयित लोंढे याने तक्रारदाराकडे पंधरा हजार रुपयांपैकी पाच हजार मागणी केली़ तसेच लाचेची रक्कम पोलीस ठाण्यात आवारात स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले़
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते़