'पुरातत्व'मधील लाचखोरी; तत्कालीन संचालक तेजस गर्गे यांचा अटकपुर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
By अझहर शेख | Published: May 18, 2024 05:25 PM2024-05-18T17:25:11+5:302024-05-18T17:25:30+5:30
रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी कारखाना उभारण्यासाठी पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र तक्रारदाराला हवे होते. यासाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाच्या सहायक संचालक कार्यालयात त्यांनी अर्ज केला होता.
नाशिक : दीड लाख रुपयांची लाच घेण्यास व त्या रकमेतून स्वत:चा हिस्सा स्वीकारण्यास संमती दिल्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या राज्य पुरातत्व विभागाचे तत्कालीन संचालक संशयित डॉ. तेजस मदन गर्गे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पुर्ण झाल्यानंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.व्ही वाघ यांनी शनिवारी (दि.१८) त्यांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. यामुळे आता गर्गे यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. एसीबीची तीन पथके त्यांचा शोध घेत आहेत.
रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी कारखाना उभारण्यासाठी पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र तक्रारदाराला हवे होते. यासाठी पुरातत्व व वस्तु संग्रहालयाच्या सहायक संचालक कार्यालयात त्यांनी अर्ज केला होता. तक्रारदाराकडून पुरातत्व विभागाच्या तत्कालीन सहायक संचालक संशयित आरती आळे यांनी त्यांच्यासाठी व साहेबांसाठी दीड लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठवडाभरापूर्वी आळे यांना रंगेहात त्यांच्या राहत्या घरात पकडले होते. या प्रकरणात गर्गे यांचाही सहभाग आढळून आला होता. यामुळे आळे व गर्गे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी त्यांच्याकडून वकिलामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर शुक्रवारी सुनावणीत दोन्ही बाजूंचा जोरदार युक्तीवाद झाला. न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. शनिवारी न्यायालयाने याप्रकरणी निकाल देताना गर्गे यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मीष्ठा घारगे-वालावलकर यांनी दिली.
लाचेच्या रकमेतून तेजस गर्गे यांनी हिस्सा घेण्यास संमती दिल्याचे मोबाइल कॉलवरील संभाषणानंतर स्पष्ट झाले. लाचेची रक्कम घेण्यास संमती देणे व प्रोत्साहित केल्याप्रकरणी आळे यांच्यासह गर्गे यांच्याविरुद्धही इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून गर्गे हे फरार आहेत. त्यांचे मुंबईतील निवासस्थानदेखील ‘सील’ करण्यात आले आहे. पुण्यातील निवासस्थानीही शोध घेण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तीन पथकांकडून त्यांचा नाशिक, पुणे, मुंबई या शहरांमध्ये शाेध घेण्यात आला. तसेच त्यांच्या संपर्कातील व जवळच्या काही व्यक्तींकडेसुद्धा एसीबीकडून विचारपूस करण्यात आली आहे; मात्र गर्गे यांचा ठावठिकाणा अद्यापही समोर आलेला नाही.