पिंप्रीसदो गावाजवळ पुलाला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:31 AM2019-08-04T01:31:25+5:302019-08-04T01:31:46+5:30
इगतपुरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे घोटी टोल नाक्याच्या पुढे इगतपुरी परिसरातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. पर्यटनख्याती असलेल्या इगतपुरी-भावली मार्गावरील भावली नदीला महापूर आला आहे. विशेष म्हणजे पिंप्रीसदो गावाजवळील पुलाला भगदाड पडल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.
इगतपुरी : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे घोटी टोल नाक्याच्या पुढे इगतपुरी परिसरातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. पर्यटनख्याती असलेल्या इगतपुरी-भावली मार्गावरील भावली नदीला महापूर आला आहे. विशेष म्हणजे पिंप्रीसदो गावाजवळील पुलाला भगदाड पडल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.
भाम धरण, परिसरातील प्रख्यात धबधबे व निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून इगतपुरी महामार्गावरील भावली धरणाकडे जाणारा मार्गच पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रोखला होता. भावलीकडे जाणाऱ्या पर्यटकांची वाहने रोखल्याने पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, पंचायत समिती उपसभापती भगवान आडोळे यांच्यासह शिष्टमंडळाने या भगदाड पडलेल्या पुलाची पाहणी केली. तसेच या परिसरात शेतीलगत अनेक घरांनाही पुराच्या पाण्याने वेढले आहे.
दरम्यान, पिंप्रीसदो मार्गावरील चारही बाजूने पुराच्या पाण्याने परिसर व्यापला असून, या परिसरातील पंढरीनाथ जंगलू भागडे यांच्या घरालाही पूरपाण्याने वेढा दिला असून घराभोवती भातशेती गेल्या १५ दिवसांपासून पाण्याखाली आहे.
भात रोपांची नासाडी
तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जलमय स्थिती असल्याने भाताच्या रोपांची पूर्णपणे नासाडी झाली असून, गेल्या १५ दिवसांपासून भातशेती पूर्णपणे पाण्यात असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. खर्च वाया गेल्याने शेतकºयांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रशासनाने दखल घेऊन तत्काळ पंचनामे करावे व शेतकºयांना दिलासा द्यावा, तसेच संकटात सापडलेल्या शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.