बाणगंगा नदीवरील पूल बंद; अत्यावश्यक सेवेची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 09:26 PM2020-05-26T21:26:26+5:302020-05-27T00:04:38+5:30
कसबे सुकेणे : मौजे सुकेणे येथील कंटेन्मेंट झोनमधील सर्व रस्ते सील करून बाणगंगा नदीवर मुख्य वाहतुकीचा पूल बंद करण्यात आल्याने मौजे सुकेणेकरांच्या अत्यावश्यक सेवेची प्रचंड मोठी कोंडी झाली आहे. या पुलावरील वाहतूक खुली करावी, शक्य होत असेल तर निदान दुचाकी सोडण्याची मुभा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कसबे सुकेणे : मौजे सुकेणे येथील कंटेन्मेंट झोनमधील सर्व रस्ते सील करून बाणगंगा नदीवर मुख्य वाहतुकीचा पूल बंद करण्यात आल्याने मौजे सुकेणेकरांच्या अत्यावश्यक सेवेची प्रचंड मोठी कोंडी झाली आहे. या पुलावरील वाहतूक खुली करावी, शक्य होत असेल तर निदान दुचाकी सोडण्याची मुभा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मौजे सुकेणे येथे दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बाधित रुग्णांच्या सभोवतालचा १०० मीटर परिसर हा कंटेन्मेंट झोन जाहीर केला असल्याने या परिसराला जोडणारे सर्व रस्ते प्रशासनाने सील केले आहेत. कंटेन्मेंट झोन तयार केल्यानंतर या झोनमधील अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, अशा सरकारी सूचना असताना, निफाडच्या प्रशासनाने मात्र या गावाची अत्यावश्यक सेवाही कसबे-सुकेणे बाजारपेठेशी जोडली गेली आहे, हे न ओळखता केवळ नियमांवर बोट ठेवत मौजे सुकेणेकरांची पुरती कोंडी केली आहे. कसबे-सुकेणे व मौजे सुकेणे या दोन गावांना जोडणाऱ्या बाणगंगा नदीवरील मुख्य पुलावरील वाहतूक बंद करून गावकऱ्यांना सुमारे चार किलोमीटरचा ओणे गावाहून फेरा मारून वैद्यकीय मदत, औषधे, दूध खरेदी करावे लागत आहे. तब्बल एक आठवड्यापासून मौजे सुकेणेकरांची अत्यावश्यक सेवांची कोंडी केली आहे. गावात एकही दवाखाना किंवा औषधांची दुकाने नाहीत. जर गावात कोणी अत्यवस्थ झाला तर त्यास वैद्यकीय मदत किंवा रुग्णवाहिका कशी उपलब्ध करायची, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. उपसरपंच सचिन मोगल यांनी बाणगंगा पुलावरून दुचाकी सोडण्याची मुभा द्यावी, अशी विनंती करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
----------------------------
-----------------------
कोरोना प्रतिबंध कारवाईसाठी आरोग्य विभाग व शासनाच्या मार्गदर्शनानुसार प्रांत अधिकारी यांनी कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे, आणखी चार-पाच दिवस नागरिकांनी सहकार्य करावे.
- दीपक पाटील,
तहसीलदार, निफाड
-----------------------------------
चांदोरी-सुकेणा-कोकणगाव रस्ता मौजे सुकेणे येथे खुला करण्याची मागणी केली आहे, परंतु कंटेन्मेंट झोनमुळे प्रशासन नकार देत आहे.
- सचिन मोगल,
उपसरपंच, मौजे सुकेणे