दमणगंगेवरील पूल कठड्यांविना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 09:48 PM2020-07-23T21:48:43+5:302020-07-24T00:24:00+5:30
पेठ : महाराष्ट्र व गुजरात या राज्यांसह पेठ तालुक्यातील उम्रद ते बोंडारमाळ या दोन गावांना जोडणारा दमणगंगा नदीवरील पूल संरक्षक कठड्यांविना असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे
पेठ : महाराष्ट्र व गुजरात या राज्यांसह पेठ तालुक्यातील उम्रद ते बोंडारमाळ या दोन गावांना जोडणारा दमणगंगा नदीवरील पूल संरक्षक कठड्यांविना असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. यामुळे अनुचित घटना घडण्यापूर्वीच संबंधित विभागाने पुलाची दुरुस्ती करून दोन्ही बाजूंना मजबूत संरक्षक कठडे व जाळ्या लावण्याची मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. साधारण कोणताही पूल बांधला म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे असणे गरजेचे असते. त्यामुळे पुलावरून पादचारी व वाहनधारकांना धोक्याचा अंदाज घेऊन प्रवास करणे सुकर होते. मात्र, दमणगंगा नदीवर बांधण्यात आलेला पूल सद्य:स्थितीत दोन्हीही बाजूंना संरक्षक कठडे नसल्याने धोकादायक ठरत आहे. रात्री-अपरात्री तसेच पावसाळ्यात या पुलावरून प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
पावसाळ्यात पुलावरून वाहते पाणी पेठ तालुक्यातील बोंडारमाळ हे सर्वाधिक दुर्गम गाव. दमणगंगा नदीने चारही बाजूने वेढा घातलेल्या या गावाचा पावसाळ्यात चार महिने इतर गावांशी संपर्कतुटत असे. त्यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत आंबापणी ते बोंडारमाळ हा जवळपास सहा किलोमीटरचा रस्ता जंगलातून काढण्यात आला, तर दमणगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र या पुलावरील कठडे दोन वर्षातच पुराच्या पाण्याच्या वाहून गेले. त्यामुळे पूल धोकेदायक बनला आहे.
दमणगंगा नदी पावसाळ्यात रौद्ररूप धारण करत असते. पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने अधिक पाऊस झाल्यास पुलावरून पावसाचे पाणी वाहते. त्यामुळे पाण्यातून मार्गक्र मण करताना प्रवाशांना पुलाच्या रुंदीचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा संभव आहे.
शिवाय पाण्याचा वेग जास्त असल्याने या पुलावरून पादचारी वाहून जाण्याचे प्रकारही घडू शकतात. त्यामुळे पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.