गिरणा नदीवरील पुलाचे काम संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 01:45 PM2020-02-09T13:45:33+5:302020-02-09T13:46:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खामखेडा ( वार्ताहर ) देवळा तालुक्यातील गिरणानदी काठी वसलेले खामखेडा-भऊर या दोन गावांना जोडणार्या गिरणा नदीवरील पुलाचे काम अंत्यत धिम्या गतीने सुरु असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी खामखेडा भऊर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
खामखेडा ते भऊर या दोन गावादरम्यानच्या गिरणा नदीवरील पुलाच्या बांधकामाला ४कोटींची मंजुरी मिळाली.१९ जानेवारी २०१९ला जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली गिरणा पुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र वर्षभराचा कालावधीे लोटून देखील अद्यापही काम पूर्ण झालेले नाही.त्यामुळे खामखेडा-भऊर गावांतील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खामखेडा आणि भऊर या दोन गावांना जोडण्यासाठी गिरणा नदीवर पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती .सुरु वातीला पुलाचे काम जलद गतीने सुरू होते परंतु मध्यंतरी पावसाच्या पाण्यामुळे नदी काही दिवस दुथडी भरून वाहत असल्याने कामाला नाईलाजास्तव पूर्णविराम मिळाला होता.आता नदी कोरडीठाक असल्याने देखील काम अगदी धिम्यागतीने सुरू असून या कामात वेळकाढूपणा केला जात असून कामात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.