उज्वला योजनाच पुन्हा गॅसवर; महागाईमुळे सिलिंडर झाले रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:17 AM2021-08-14T04:17:36+5:302021-08-14T04:17:36+5:30
नाशिक : अत्यल्प उत्पन्न घटकातील कुटुंबीयांना कोणतीही अनामत रक्कम न घेता गॅस जोडणी देण्याचा, तसेच गाव खेड्यातील महिलांची चुलीच्या ...
नाशिक : अत्यल्प उत्पन्न घटकातील कुटुंबीयांना कोणतीही अनामत रक्कम न घेता गॅस जोडणी देण्याचा, तसेच गाव खेड्यातील महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्तता व्हावी, या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेली उज्वला गॅस योजनाच आता गॅसवर आली आहे. सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांना गॅस सिलिंडर घेणे परवडत नसल्याने ही योजना केवळ नावालाच उरली असल्याचे एकूणच चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षभरात चार वेळा गॅस सिलिंडरचे दर वाढले असल्याने आता सिलिंडर न वापरलेलाच बरा, अशी गृहिणींची अवस्था बनली आहे. विनाअनामत ही योजना असल्यामुळे अनेकांच्या घरात सिलिंडर आले, मात्र महागाईमुळे गॅस भरणे कठीण बनल्याने गाव खेड्यातील गृहिणी पुन्हा चुलीकडे वळल्या आहेत.
--इन्फो--
जिल्ह्यात आतापर्यंत मिळालेली उज्वला कनेक्शन्स
२२४४१९
--इन्फो--
गॅस सिलिंडरचे दर (रुपयात)
जानेवारी २०१९ : ७१०
जानेवारी २०२० : ७४०
जानेवारी २०२१ : ७९०
ऑगस्ट २०१९ : ८३५
--कोट--
सिलिंडर भरणे कसे परवडणार?
शासनाने मोफत कनेक्शन दिले आणि सिलिंडर महाग केले. त्यामुळे बदल काहीच झाला नाही. सुरुवातीला चार सिलिंडर विकत घेतले. आता नको तो सिलिंडर, आपला स्टोव्ह आणि चूलच बरी!
- आशाबाई बनसोड, गृहिणी
मोफत योजना फक्त म्हणायला झाली. मोफत कनेक्शन दिल्यानंतर त्यांची काय परिस्थिती आहे, याची माहिती कुणी घेतली आहे का? महिलांची धुरापासून मुक्ती झाली आहे का? हेही एकदा सरकारने पाहावे.
- शालुबाई राऊत, गृहिणी
गॅस आल्यामुळे घरातील कामे लवकर होऊन कामावर लवकर जाता येईल असे वाटले होते. परंतु रिकाम्या गॅस सिलिंडरची अडचण होऊ लागली आहे. सिलिंडर आहे, पण भरता येत नाही. त्यासाठी उधारी नाही, काय करायचं सांगा?
- कौसाबाई जोपळे, गृहिणी