सूर्याभोवती दिसले तेजोमय सप्तरंगी कंकण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:58 AM2019-08-25T00:58:13+5:302019-08-25T00:59:09+5:30
वेळ शनिवारी (दि.२४) सकाळी ११:३० वाजेची. नाशिककर दैनंदिन कामात असताना अचानकपणे सूर्याभोवती एक सप्तरंगी कंकण झळकले. या सप्तरंगी तेजोमय वर्तुळाने बहुतांश लोकांचे लक्ष वेधून घेतले.
नाशिक : वेळ शनिवारी (दि.२४) सकाळी ११:३० वाजेची. नाशिककर दैनंदिन कामात असताना अचानकपणे सूर्याभोवती एक सप्तरंगी कंकण झळकले. या सप्तरंगी तेजोमय वर्तुळाने बहुतांश लोकांचे लक्ष वेधून घेतले. प्रकाशकिरणांचा हा चमत्कार अनुभवण्यासाठी नाशिककरांच्या नजरा आकाशाकडे पुढील वीस मिनिटं खिळून राहिल्या.
खगोलीय बदल नेहमीच नागरिकांच्या कुतूहलाचा विषय राहिला आहे. वर्षानुवर्षानंतर खगोलीय आविष्कार होत असतात. आकाशात घडून येणाऱ्या या आविष्कारांकडे अलीकडे सोशल मीडियामुळे अनेकांचे लक्ष वेधले जाऊ लागले आहे. लक्षवेधी खगोलीय बदलाविषयी जागरूकतादेखील वाढीस लागत आहे. असाच काहीसा बदल जो प्रकाशकिरणांमुळे घडून येतो तो नाशिककरांनी शनिवारी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. सकाळी सूर्यकिरणे प्रखरपणे पडलेली होती. अचानकपणे ११.३० वाजेच्या सुमारास शहरात काहीसे ढग दाटून येऊ लागले आणि ऊन-सावलीचा खेळ सुरू होताच सूर्याभोवती सप्तरंगी कंकणाकृती उमटलेली दिसली. या तेजोमय वलयाने नाशिककरांचे तत्काळ लक्ष वेधले. ज्यांचे प्रथम लक्ष वेधले गेले त्यांनी त्वरित आपल्या जवळच्या लोकांना सांगितले. त्यामुळे अनेकांना आज सूर्यनारायणाचे बदललेले रूप पहावयास मिळाले. सुमारे वीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ सूर्याभोवती सप्तरंगी वर्तुळ दिसत होते. अनेकांनी सूर्याचा हा नवा ‘लूक’ कॅमेºयात टिपला आणि सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल केला. परिणामी अतिजलदपणे सूर्याभोवती कंकण उमटल्याची वार्ता शहरात वाºयासारखी पसरली अन् नाशिककरांच्या नजरा आकाशला भिडल्या.
वातावरणात ६ ते ७ किलोमीटर उंचीवर अति विरळ ढगांची निर्मिती होते. या निर्मितीला सायरस नावाची ढगनिर्मिती असे खगोलीय शास्त्रीय भाषेत म्हटले जाते. जेव्हा सूर्य डोक्यावर येऊ लागतो तेव्हा सूर्यकिरणे या ढगांवर पडतात तेव्हा ढगांमधील बर्फाच्या स्फटिकांच्या २२ अंशांच्या कोनातून निरीक्षणाकडे वळतात. परिणामी जमिनीवरून सूर्याकडे बघताना सूर्याभोवती तेजोमय सप्तरंगी कंकणाकृती तयार झालेली दिसून येते.
सूर्याभोवती जसे वर्तुळ बघावयास मिळाले तसे ते काहीवेळा चंद्राभोवतीही पहावयास मिळू शकतात. प्रकाशकिरणे ढगांमधील बर्फाच्या स्फटिकांवर पडल्यानंतर ते परावर्तित होतात. या प्रकाशकिरणांचा हा आविष्कार म्हणता येईल. नाशिक शहरात हा आविष्कार अर्धा तास शनिवारी बघता आला. विद्यार्थ्यांमध्ये त्याचे कुतूहल पहावयास मिळाले. नाशिकमध्ये जेव्हा असे वर्तुळ दिसले तेव्हा ते अन्य शहरांमध्येही दिसले असेलच असे नाही. ‘सायरस’ढगांची निर्मिती वातावरणात असेल तेथेच, असा आविष्कार पहावयास मिळू शकतो.
-अपूर्वा जाखडी, स्पेस एज्युकेटर