पंचवटीत सोनसाखळी हिसकावणाऱ्या दोघांना २४ तासांत बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 04:04 PM2020-01-07T16:04:11+5:302020-01-07T16:14:59+5:30
तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने गुन्हेगारांचा माग काढला. या दोघा संशयितांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल आहे.
नाशिक : पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुठेगल्ली शनिमंदिर येथून पायी जात असताना अनिता अनिल शेवाळे (वय ५४, रा.सुकेनकर लेन) यांची सोनसाखळी हिसकावून पोबारा करणा-या दोघा चोरट्यांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने २४ तासांत बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून अन्य गुन्हेदेखील उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेवाळे या कामानिमित्त पायी जात असताना दुचाकीवरून आलेले संशयित राजू मुंजाभाऊ वाघमारे (वय २२, रा. गोरक्षनगर, आरटीओ कॉर्नर), किरण भगवान पाईकराव (वय २४, रा. कालिका चाळ) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. या दोघा चोरट्यांनी मिळून गुरुवारी (दि.२) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पंचवटीतील एका पतसंस्थेजवळ मुठेगल्लीत शेवाळे यांच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाची सुमारे १५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला होता. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली काळ्या रंगाची पल्सर दुचाकीदेखील जप्त केली आहे. त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीचे पंचवटी, म्हसरूळ परिसरातील अन्य गुन्हेदेखील उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सहायक निरीक्षक आर. व्ही. शेगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे त्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने गुन्हेगारांचा माग काढला. या दोघा संशयितांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल आहे.
या गुन्ह्याचीदेखील होऊ शकते उकल
पंचवटी पोेलीस ठाण्याच्या हद्दीत चक्रधरनगरमध्ये घडली. पुष्पलता सोनुराव नेहते (६९) या त्यांचे राहते निवास ओमकार बंगल्यापुढे रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास शेजाऱ्यांशी बोलत उभ्या होत्या. यावेळी मेरी-रासबिहारी लिंकरोडवरून सुसाट काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी नेहते यांच्याजवळ येत दुचाकी थांबविली. यावेळी एका अपार्टमेंटचे नाव घेत पत्ता विचारण्याचा बनाव करत बोलण्यात गुंतवून दुचाकीचालकाच्या पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली आणि भरधाव दोघे चोरटे दुचाकीवरून पसार झाले. नेहते यांच्या गळ्यातील २ तोळ्याचे सोन्याच्या वाट्या असलेले मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून नेत ५० हजारांचे सोने लुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.