जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहासजमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 09:03 PM2017-08-24T21:03:39+5:302017-08-24T21:27:27+5:30
नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या नऊ मोठ्या ब्रिटिशकालीन पुलांवरील वाहतूक सुरुळीत असली तरी भविष्यात हे पूल इतिहास जमा होणार आहेत.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या नऊ मोठ्या ब्रिटिशकालीन पुलांवरील वाहतूक सुरुळीत असली तरी भविष्यात हे पूल इतिहास जमा होणार आहेत. पुलांच्या मागीलवर्षीच्या पाहणी अहवालावरून हे पूल सुस्थितीत असले तरी भविष्यात या पुलांना समांतर पूल बांधावे लागण्याचा अभिप्राय नोंदविण्यात आलेला आहे.
नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित जिल्ह्यातील नऊ मोठ्या पुलांचा समावेश आहे. गिरणा, खडकी, वाघाडी, लक्ष्मी, अगस्ती, दारणा, स्थानिक नाला आणि पार नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे. या पुलांची पावसाळ्यापूर्वी तपासणी करण्यात आली असून, यातील पाच पूल हे सुस्थितीत असल्याची नोंद करण्यात आली आहे, तर तीन पुलांना समांतर पूल बांधण्यात आलेले आहेत. एक पुलाची दुरुस्ती सुचविण्यात आली असून, पूल पाडण्याची गरज नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या ब्रिटिशकालीन पुलांची किरकोळ दुरुस्ती करण्यात आली असली तरी पुल जुना झाल्याने भविष्यात पुलांची पुनर्बांधणी आवश्यक असल्याचा शेरा मारण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे सर्व पूल शंभर वर्षांपेक्षा जास्त आर्युमानाचे झाल्याने या पुलांना समांतर पूल निर्माण होऊन ब्रिटिशकालीन पुलांवरील वाहतूक कमी केली जाणार आहे. दोन ठिकाणी नवीन पूल निर्माणही झाले असून, एका पुलाला समांतर पुलाचे काम प्रगतिपथावर आहे.
दरम्यान, महापालिका हद्दीतील तसेच महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलांची माहिती संबंधित विभागाकडे असून, या पुलांच्या दुरुस्तीसाठीचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागालाच करावे लागते. राज्य मार्गावरील ३० मीटरपेक्षा अधिक लांबीच्या जवळपास शंभर पुलांचीदेखील पावसाळ्यापूर्वीच तपासणी करण्यात आली असून, त्याबाबतचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यानुसार शंभर पूल हे सुस्थितीत असून, ६८ पुलांमध्ये किरकोळ आणि मोठी दुरुस्ती सुचविण्यात आलेली आहे.