महिनाभरात २२ बसेसच्या फुटल्या काचा; दोन लाखांचे झाले नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 03:04 PM2021-12-18T15:04:13+5:302021-12-18T15:05:29+5:30
नाशिक : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचारी संपावर आहेत. नाशिकमध्ये देखील ...
नाशिक : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचारी संपावर आहेत. नाशिकमध्ये देखील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून, जिल्ह्यातील १३ डेपोंमधील ठप्प आहेत. या काळात काही ठिकाणी बसेस सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता, २२ बसेसवर दगडफेक झाल्याने सुमारे २,२८,५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. नाशिक विभागात बसस्थानकात उभ्या असेलल्या तर काही ठिकाणी रस्त्यावरून धावणाऱ्या बसेसवर दगड फेकण्यात आले आहेत. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
संपाबाबत अजूनही तोडगा निघाला नसल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत, तर पुरेसे कर्मचारी हजर नसल्यामुळे महामंडळाला बसेस चालविणे देखील कठीण झाले आहे. दुसरीकडे काही कर्मचारी पुढे आल्यानंतर बसेस सुरू करण्याचा प्रयोग करण्यात आला; मात्र त्यानंतर काही भागात बसेसवर दगडफेक करण्यात आल्याने बसेसचे नुकसान झाले. दगड कुणी फेकले हे मात्र अजूनही पोलिसांना शोधता आलेले नाही. त्यामुळे अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.
शिवशाहीचे सर्वाधिक नुकसान
नाशिकमधून खासगी शिवशाही बसेस सुरू झाल्यानंतर सर्वाधिक शिवशाही बसेसला लक्ष्य करण्यात आले. महामार्ग बसस्थानक, सिन्नर बायपायस तसेच निफाड मार्गावरही बसचे नुकसान खरण्यात आले. पिंपळगाव, चांदवड तसेच पंचवटी येथेही बसेसच्या काचा फोडण्याच्या घटना घडल्या आहेत.
३१ अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल
बसेसवर दगडफेक करणाऱ्या एकूण ३१ अज्ञातांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिन्नर आणि निफाड मार्गावर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी दगडफेक केल्याची फिर्याद दाखल आहेत. अन्य तिघा अज्ञातांवर देखील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
बसेस सुरू झाल्या किती
जिल्ह्यातील आगार : १३
एकूण बसेस : ८७१
सध्या धावत असलेल्या बसेस : १८
एकूण कर्मचारी : ५२५४
सध्या कामावरील कर्मचारी : ८२२