पशुधन वाचविण्यासाठी ‘ब्रुसेला’ लसीकरण मोहीम
By admin | Published: October 9, 2014 01:04 AM2014-10-09T01:04:25+5:302014-10-09T01:12:53+5:30
पशुधन वाचविण्यासाठी ‘ब्रुसेला’ लसीकरण मोहीम
नाशिक : जिल्ह्यात अत्यंत घातक व दुर्मीळ असा ब्रुसेला हा आजार गाय आणि म्हैस या पशुधनाला जडण्याचा धोका असून, त्याचे उच्चाटन करण्यासाठी चार ते बारा महिन्यांच्या आतील गाय व म्हशीच्या वासरू व पारडू यांना ब्रुसेला लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुंडलिकराव बागुल यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्णात हा ब्रुसेला आजाराची लागण दिसून आल्याने त्यावर तातडीचे उपचार म्हणून ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आल्याचे डॉ. पुंडलिकराव बागुल यांनी सांगितले आहे. ब्रुसेला या आजारात गाय किंवा म्हशीला गर्भधारणा होत नाही. तसेच अशा गायी किंवा म्हशीच्या संपर्कात एखादा पशुधन विकास अधिकारी आलाच आणि त्याने निर्जंतुकीकरणाशिवाय काळजी न घेता घरात वावर केल्यास प्रत्यक्षात मनुष्यालाही हा आजार बळावण्याची शक्यता आहे. म्हणूनच जिल्ह्णातील गाय व म्हशीच्या चार ते बारा महिन्यांच्या आतील वासरू व पारडू यांना ही ब्रुसेला लस टोचण्यात येणार असून, येत्या २० आॅक्टोबरपर्यंत ही ब्रुसेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनीही या लसीकरणात सहभागी होऊन आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. पुंडलिकराव बागुल यांनी केले आहे. (प्रतिनिधी)