नाशिकच्या कुंभमेळ्याला अर्थसंकल्पात ठेंगा! कोणतीही तरतूद नाही, निओ मेट्रोही वाऱ्यावरच
By संजय पाठक | Updated: February 2, 2025 14:43 IST2025-02-02T14:42:19+5:302025-02-02T14:43:39+5:30
Budget 2025: प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या व्यवस्थेचे कौतुक होत असताना दोन वर्षांवर आलेल्या नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी केंद्रशासनाच्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिकच्या कुंभमेळ्याला अर्थसंकल्पात ठेंगा! कोणतीही तरतूद नाही, निओ मेट्रोही वाऱ्यावरच
- संजय पाठक
नाशिक - प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या व्यवस्थेचे कौतुक होत असताना दोन वर्षांवर आलेल्या नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी केंद्रशासनाच्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या निओ मेट्रासाठी देखील अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नसल्याने मेट्रोला पुन्हा ब्रेक लागल्याचे दिसत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी (दि.१) अर्थसंकल्प सादर केला. त्यात कुंभमेळा किंवा नाशिकसाठी काेणती तरतूद नसल्याचे दिसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
श्री क्षेत्र नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दोन वर्षानंतर म्हणजेच २०२६-२७ या वर्षात कुंभमेळा हेाणार आहे. राज्यशासनाने नियुक्त केलेल्या समित्यांच्या माध्यमातून जिल्हा आणि राज्यस्तरावर जोरदार तयारी सुरू आहे. कुंभमेळ्याचा आराखडा सुमारे १२ कोटी रूपयांचा आहे. या आराखड्यात मुळातच अनेकदा छाटणी करण्यात आली आहे. शासनावर आर्थिक ताण नको म्हणून आराखड्यातील अनेक कामे वगळली जात असली तरी दुसरीकडे मात्र, दीर्घकालीन पण स्थायी कामे हेाणार नसतील तर काय उपयोग असा प्रश्न केल जात आहे.
नाशिकच्या कुंभमेळ्यातील पायाभूत सुविधांचा आराखडा अद्याप तयार नाही. मात्र, निओ मेट्रो, दक्षीण गंगा गोदावरी नदीचे शुध्दीकरण यासाठी केंद्रशासनाला अर्थसंकल्पात तरतूद करणे शक्य होते मात्र, तरी करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.