जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:17 AM2021-03-09T04:17:38+5:302021-03-09T04:17:38+5:30
अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी विकास व कृषी संशोधनावर अधिक भर देण्यात आल्याने आगामी काळात ...
अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी विकास व कृषी संशोधनावर अधिक भर देण्यात आल्याने आगामी काळात कृषी क्षेत्राला चांगले दिवस येऊ शकतील. युवकांना कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
- यशवंत गावंडे, प्रगतिशील शेतकरी, गावंदपाडा, ता.पेठ
---------------------------
राज्याच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रालाही प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बाजार समित्यांच्या बळकटीकरणास प्राधान्य देत बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली. ‘विकेल ते पिकेल’ या धोरणानुसार राज्यात पिकनिहाय मूल्य साखळ्यांच्या विकासासाठी २१०० कोटी रुपयांची तरतूद केली. कृषी संशोधनासाठी कृषी विद्यापीठांना प्रतिवर्ष २०० कोटी याप्रमाणे तीन वर्षांसाठी ६०० कोटींची तरतूद केली. वीजजोडणी व सिंचनालाही प्राधान्य दिले. या नुसत्या घोषणा ठरू नये. प्रत्यक्षात कृती अपेक्षित आहे. कोरोनाने अर्थिक अडचणीत सापडलेल्या, थकलेल्या शेतकर्यांचे वीजबिल माफ करण्याची आवश्यकता होती.
- संतू पाटील झांबरे, शेतकरी नेते, येवला
----------------------------------------------
अर्थसंकल्प समाधानकारक व सर्वसमावेशक म्हणावा लागेल. त्यात कृषी, आरोग्य, दळणवळण आणि पर्यटनासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. विशेषत: शेतकऱ्यांसाठी चांगला अर्थसंकल्प म्हणावा लागेल. कृषिपंप जोडणी, शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदाराने कर्ज असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. वाहतूक सुकर करण्यासाठी चांगली तरतूद आहे. सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराचा पर्यटनमधून विकास करण्यासाठी भरीव निधी मिळणार आहे. आरोग्य क्षेत्राला ७५०० हजार कोटीची तरतूद समाधानकारक आहे. कृषी व पशुसंवर्धनासाठी मोठा निधी आहे. विकेल ते पिकेलसाठी २१०० कोटी दिल्याने शेतकऱ्यांचे समाधान झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीसाठीही दोन हजार कोटींची तरतूद झाल्याने शेतकऱ्यांचा हा अर्थसंकल्प सुखावणारा आहे.
- हौशिराम घोटेकर, अध्यक्ष, नाशिक जिल्हा दूध संघ
-------------------------------------------------
सप्तशृंगी गडावरील तीर्थक्षेत्र विकासासाठी व पाणीटंचाईसह इतर विकासकामांसाठी भरीव निधीची तरतूद केली असल्यामुळे गडाच्या विकासाला आता खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. गडावरीलअंतर्गत रस्ते विकासाला चालना मिळणार असल्यामुळे कळवण तालुक्यासाठी आशादायी अर्थसंकल्प आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची तरतूद केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी रोजगार निर्मिती व कल्याणकारी योजनांबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आले आहे ही विशेष बाब आहे. जिल्ह्यात नवीन अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील तरुणाईला शिक्षण तसेच रोजगार जिल्ह्यातच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आशादायी अर्थसंकल्प आहे
- घनश्याम पवार, नवीबेज
---------------------------------------------------
नाशिक जिल्ह्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग उभारणार असल्याने शेतकऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्याबरोबरच शेतकरी बांधवांना तीन लाख रुपये कर्जावर शून्य टक्के व्याजदर असल्याने कोरोनाच्या संकटामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने आधार मिळणार आहे. राज्यसरकार बाजारसमितीच्या बळकटीसाठी दोन हजार कोटींची योजना राबविणार असल्याने शेतकरी बांधवांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सुगीचे दिवस निश्चित येतील अशी आशा आहे.
संदीप गुळवे, मुख्य प्रशासक, कृउबा, घोटी
---------------------------------------------------------
सर्वसामान्य जनतेच्या हितास प्राधान्य देणारा अर्थसंकल्प सादर झाला. शेतकरी बांधवांना बिनव्याजी कर्जाने आत्महत्यांचे सत्र थांबेल. कृषी क्षेत्राला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. गोरगरीब मुलींच्या शिक्षणासाठी पायपीट थांबून पालकांना मदत होईल. सप्तशृंगी गड उत्तर महाराष्ट्रवासीयांचे आराध्य देवता असून, विकासासाठी निधी देण्याचा निर्णय अभिनंदनीय आहे.
- संजय फतनानी, उद्योजक, मालेगाव
--------------------------------
कोरोनाचे संक्रमण असताना आरोग्याबरोबरच कृषी व ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारा हा अर्थसंकल्प आहे. कृषी व पायाभूत सुविधा बरोबरच शेतकऱ्याला तीन लाखांपर्यंतचे कर्ज हे शून्य टक्के व्याजदराने देण्यात येणार असल्याने त्याचा मोठा फायदा होणार आहे. बाजार समिती बळकटीकरणासाठीदेखील निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालालादेखील योग्य भाव मिळेल. शिकाऊ उमेदवारांना प्रोत्साहन योजना सुरू करण्यात येणार असल्यामुळे आर्थिक नाडीदेखील मजबूत होईल. कोरोना संकट असतानादेखील कृषी व पायाभूत सुविधांमुळे रोजगार उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. निफाड तालुक्यात चितेगाव फाट्या वर असलेल्या होर्टीकल्चर बोर्डामार्फत व जवळून जात असलेल्या सुरत चेन्नई महामार्गामुळे तेथे ऍग्री कॉरिडॉरचा विचार वरिष्ठ स्तरावरून झाल्यास कृषी उद्योगासाठी तो टर्निंग पॉईंट ठरेल.
- रामभाऊ माळोदे, उद्योजक, पिंपळगाव बसवंत