महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा तिढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:35 AM2018-03-06T01:35:05+5:302018-03-06T01:35:05+5:30
महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक येत्या बुधवारी (दि.७) सादर करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगरसचिव विभागाला पत्र दिले असले तरी, सद्य:स्थितीत स्थायी समितीवर अवघे तीनच सदस्य असल्याने आयुक्तांची कोंडी होऊन अंदाजपत्रकाचा तिढा वाढला आहे. बुधवारीच महापौरांनी स्थायीवरील रिक्त पाच सदस्यांच्या नियुक्तीसाठी विशेष सभा बोलाविली आहे.
नाशिक : महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक येत्या बुधवारी (दि.७) सादर करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगरसचिव विभागाला पत्र दिले असले तरी, सद्य:स्थितीत स्थायी समितीवर अवघे तीनच सदस्य असल्याने आयुक्तांची कोंडी होऊन अंदाजपत्रकाचा तिढा वाढला आहे. बुधवारीच महापौरांनी स्थायीवरील रिक्त पाच सदस्यांच्या नियुक्तीसाठी विशेष सभा बोलाविली आहे. त्यामुळे, यापूर्वी नियुक्त झालेले आठ आणि बुधवारी नियुक्त होणारे पाच अशा एकत्रित १३ सदस्यांचा ठराव महापौरांकडून पाठविला जाण्याची शक्यता असल्याने अंदाजपत्रकासाठी आयुक्तांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकार-ल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी तयार केलेले अंदाजपत्रक जसेच्या तसे स्थायी समितीवर सादर न करता त्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार, मुंढे यांनी अधिकाºयांच्या मॅरेथॉन बैठका घेत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. आयुक्तांनी अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करण्यासाठी नगरसचिव विभागाला पत्र दिले आहे. शिवाय, येत्या ७ मार्चला सकाळी ११ वाजता बैठक बोलविण्याची सूचनाही केली असल्याचे समजते. परंतु, याचवेळी महापौरांनी स्थायी समितीतील राजीनामा दिलेल्या पाच सदस्यांच्या रिक्त जागांवर नव्याने नियुक्ती करण्यासाठी विशेष महासभा बोलाविली आहे. मागील सप्ताहात स्थायीवरील निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या नियुक्त्या विशेष महासभेत जाहीर करण्यात आल्या. परंतु, त्याबाबतचा रितसर ठराव मात्र नगरसचिव विभागाकडे महापौरांकडून अद्याप रवाना झालेला नाही. त्यामुळे, सद्य:स्थितीत स्थायी समितीवर शिवसेनेचे प्रवीण तिदमे व भागवत आरोटे आणि मनसेच्या कोट्यातून नियुक्त झालेले अपक्ष मुशीर सय्यद हे तीनच सदस्य आहेत. नियमानुसार, स्थायीची सभा बोलाविण्यासाठी किमान पाच सदस्य आवश्यक आहेत. त्यामुळे, आयुक्तांनी नगरसचिव विभागाला बैठकीचे पत्र दिले असले तरी नियमानुसार, सभा बोलविता येणार नाही. परिणामी, आयुक्तांना अंदाजपत्रक सादर करता येणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महापौरांनी मागील सप्ताहात नियुक्त केलेल्या ‘त्या’ आठ सदस्यांचा ठराव पाठविला तरच ११ सदस्य संख्या होऊन आयुक्तांच्या विशेषाधिकारात २४ तासांच्या आत स्थायीची सभा काढता येणार आहे. तूर्त स्थायीवर तिनच सदस्य असल्याने आयुक्तांची मात्र कोंडी झाली असून, त्यांना अंदाजपत्रक सादर करण्यासाठी महापौरांच्या ठरावाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ज्येष्ठ सदस्याकडे सादर होणार अंदाजपत्रक
स्थायी समितीवर भाजपाकडून दिनकर पाटील, उद्धव निमसे, पुष्पा आव्हाड आणि भाग्यश्री ढोमसे, कॉँग्रेसकडून समीर कांबळे, राष्टÑवादीच्या सुषमा पगारे व सेनेचे संतोेष साळवे व संगीता जाधव यांची नियुक्ती झालेली आहे, तर भाजपाच्या पाच सदस्यांनी राजीनामे दिल्याने त्यांच्या जागेवर संभाजी मोरुस्कर, कमलेश बोडके, कोमल मेहरोलिया, भिकूबाई बागुल आणि हिमगौरी आडके यांची नावे अंतिम करण्यात आल्याचे समजते. प्रवीण तिदमे, भागवत आरोटे व मुशीर सय्यद हे तीन सदस्य अद्याप स्थायीवर आहेत. स्थायी समिती १६ सदस्यांची गठित झाल्यानंतर ज्येष्ठतेनुसार भिकुबाई बागुल अथवा दिनकर पाटील यांच्यापैकी एकाला हंगामी सभापती नेमून त्यांच्याकडे आयुक्तांना अंदाजपत्रक सादर करावे लागणार आहे. आयुक्तांनी मात्र, दि. ७ मार्चला तीन सदस्यांच्या उपस्थितीतच अंदाजपत्रक सादर करण्याचा आग्रह धरला, तर ज्येष्ठतेनुसार अपक्ष असलेल्या मुशीर सय्यद यांच्या हाती अंदाजपत्रक सुपूर्द करावे लागणार आहे. अर्थात त्याच्या कायदेशीर वैधतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.