लोणच्याची कैरी महागल्याने गृहीणींचे बजेट कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 05:47 PM2020-06-14T17:47:58+5:302020-06-14T17:50:30+5:30
लोणच्यासाठी गावरान कैरीला अधिक मागणी असते .यंदा प्रतिकूल हवामानामुळे कैऱ्यांची आवक कमी असून लोणच्यासाठी कैऱ्या बाजारात दाखल झाल्या असल्या तरी दर जास्त असल्याने गृहीणींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे .
नाशिक : दरवर्षी पाऊस पडल्यानंतर जून महिन्यामध्ये घरोघरी लोणचे तयार करण्यास सुरुवात होते. लोणच्यासाठी गावरान कैरीला अधिक मागणी असते .यंदा प्रतिकूल हवामानामुळे कैऱ्यांची आवक कमी असून लोणच्यासाठी कैऱ्या बाजारात दाखल झाल्या असल्या तरी दर जास्त असल्याने गृहीणींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे . कारण लोणच्यासाठी लागणारी लाल मिरची ( तिखट चटणी ) आणि अन्य मसाला यांचे दर देखील वाढल्याने गृहीणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
लोणचे तयार करण्याच्या मसाल्यासाठी लाल मिरची ,मोहरी डाळ, हिंग ,मीठ , हळद ,बडीशेप, लवंग, विलायची, धने आदि प्रकारचा मसाला लागतो. त्यानंतर कैऱ्या फोडून घ्याव्या लागतात. बाजारात कैऱ्या फोडण्याचे दर देखील वाढले आहेत. गरम तेलात टाकुन कैरीच्या फोडीला मसाला लावून मातीचे मडके किंवा चिनीमातीच्या बरणीमध्ये ठेवण्यात येते. त्यामुळे लोणचे अधिक चवदार बनते .आता बाजारात कैऱ्या दाखल झाल्या असून त्यांचा दर जास्त असल्याने गृहिणींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे .सतत पडणारा पाऊस व हवामान बदलांमुळे काही झाडांच्या कैऱ्या आधीच गळून पडल्या असून बाजारात कैऱ्या विक्री साठी आल्या आहेत. नाशिक बाजार समितीत नगर, ठाणे ,जळगाव, नंदुरबार, धुळे आदि जिल्'ातून मोठ्या प्रमाणावर कैऱ्यांची आवक होते. पहिला पाऊस पडला की घरोघरी लोणचे तयार करायला सुरुवात होते. सध्या पेठरोड येथील बाजार समितीमध्ये तसेच सिडको ,सातपूर आदि ठिकाणच्या बाजारात कैरीची विक्री होत आहे. सध्या गावरान कैरीचा भाव साधारणता ऐंशी ते शंभर रुपये किलो असा आहे, तर कलमी कैरीचा भाव चाळीस ते पन्नास रुपये किलो असा आहे.