स्थायी समितीचे अंदाजपत्रक सोमवारी येणार सभेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 01:07 AM2021-05-28T01:07:17+5:302021-05-28T01:08:32+5:30
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेचे अंदाजपत्रक येत्या सोमवारी (दि. ३१) महासभेवर मांडण्यात येणार आहे. स्थायी समितीने दोन हजार ७५९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला असला तरी आता सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर विकासाची भांडवली कामे रखडल्याने त्याबाबत मेाठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यता आहे.
नाशिक : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेचे अंदाजपत्रक येत्या सोमवारी (दि. ३१) महासभेवर मांडण्यात येणार आहे. स्थायी समितीने दोन हजार ७५९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला असला तरी आता सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर विकासाची भांडवली कामे रखडल्याने त्याबाबत मेाठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यता आहे.
गेल्या मार्च महिन्यातच आयुक्त कैलास जाधव यांनी स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर केले होते. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी दोन हजार ७५९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. त्यावेळी नगरसेवकांना चाळीस लाख रुपयांचा भरीव आर्थिक निधी देण्याची तरतूद करण्यात आली होती. तसेच कोणतीही करवाढ न केल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला होता. तसेच नवीन रस्ते आणि पूल तसेच अन्य कामांसाठीदेखील दोनशे कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली आहे. महापालिकेला आर्थिक चणचण असली तरी युनिफाइड डीसीपीआर मंजूर झाल्याने तब्बल साडेचारशे कोटी रुपये मिळू शकतील, असा अंदाज बांधला होता. त्यानंतर स्थायी समितीने अंदाजपत्रक तयार केले असले तरी दोन महिने कोरोनाचे संकट वाढल्याने अंदाजपत्रकीय सभा होऊ शकत नव्हती. मात्र आता सभापती गिते यांनी तयार केलेले दोन हजार ७५९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महासभेवर मांडण्यात आले आहे. सोमवारी (दि. ३१) ही महासभा महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.