बिल्डरने अनधिकृत बांधकाम केले, बेसमेंट ताब्यात आहे, संरक्षक भिंत तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:15 AM2021-01-03T04:15:45+5:302021-01-03T04:15:45+5:30
गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या कामकाजात येणाऱ्या अडचणींसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सहकार उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने शनिवारी तिडके कॉलनीतील ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात ...
गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या कामकाजात येणाऱ्या अडचणींसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सहकार उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने शनिवारी तिडके कॉलनीतील ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात हौसिंग दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, तालुका उपनिबंधक फय्याज मुलाणी, सेवानिवृत्त अपर निबंधक भगवान पाटील, माजी प्राचार्य डॉ. माधव गायकवाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधाकर खांबेकर, ॲड. मधुकर फटांगरे, ॲड. वसंतराव तोरणे आदी मान्यवर उपस्थित हाेते.
सोसायटी सभासदांना विकासकाकडून सोसायटी जमिनीचे कायदेशीर हक्क प्रदान करण्याच्या उद्देशाने सहकार विभागाच्या वतीने दि. १ ते १५ जानेवारीदरम्यान मानवी अभिहस्तांतरण मोहीम राबविण्यात येत असून, याबाबतही या कार्यक्रमात उपस्थित सोसायट्यांचे पदाधिकारी आणि सभासदांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बोलताना उपनिबंधक सतीश खरे म्हणाले, केवळ सोसायटी रजिस्टर करून थांबू नका, तर सोसायटी ज्या जमिनीवर उभी आहे त्या जमिनीवरही आपला मालकी हक्क स्थापित करण्यासाठी कन्व्हेन्स डीड करणे आवश्यक आहे.
चौकट -
अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन
प्रश्नोत्तराच्या स्वरूपात झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित सोसायटी सभासदांनी विविध शंका उपस्थित केल्या, सोसायटी रजिस्ट्रेशनसाठी येणाऱ्या अनेक अडचणीही मांडल्या, या शंकांचे अधिकाऱ्यांनी निरसन करून येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन केले.
चौकट -
मोडकळीस आलेल्या सोसायटीच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव सादर केल्यास त्यास आठ दिवसांत मंजुरी मिळते, असे जिल्हा उपनिबंधकांनी एका महिलेच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले; पण आम्ही प्रस्ताव देऊन बरेच दिवस झाले तरीही अजून प्रस्ताव मंजूर झाला नसल्याचे संबंधित महिलेने सांगितल्यानंतर उपनिबंधकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. यासंबंधी तत्काळ त्यांनी संबंधितांकडून माहिती घेतली. सोसायटीमधील बहुसंख्य सभासद वयोवृद्ध असल्याने काही बाबींची पूर्तता करण्यात अडचणी येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.