बिल्डर्स, आर्किटेक्ट्स यांना काळ्या यादीत टाकावे
By admin | Published: June 22, 2016 11:55 PM2016-06-22T23:55:06+5:302016-06-23T00:02:06+5:30
चटईक्षेत्राचे उल्लंघन : ग्राहक पंचायतीचे निवेदन
नाशिक : सदनिका विक्रीत चटईक्षेत्राच्या नियमांचे उल्लंघन करत ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर आणि आर्किटेक्ट्स यांना काळ्या यादीत टाकण्याची व त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने केली आहे.
कृष्णा होम्सप्रकरणी जिल्हा ग्राहक न्याय मंचाने नुकताच महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. संबंधित ग्राहकाला फसवणूकप्रकरणी पाच लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश बिल्डरला देण्यात आले आहेत. महापालिकेकडून पूर्णत्वाचा दाखला घेतल्यानंतर ६० टक्के सदनिकांचे खरेदी करार बिल्डरने करून त्याची घरपट्टी लावणे हे मनपाने तपासणे आवश्यक आहे. परंतु महापालिकेतील नगररचना विभागाचे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. कमी चटईक्षेत्राचे फ्लॅट विकून कमी पार्किंग बांधून जास्त चटईक्षेत्राचे व पार्किंगचे जादा पैसे ग्राहकांकडून वसूल केले जात आहेत. महापालिका आयुक्तांनी नगररचना विभागातील कारभाराची स्वतंत्र एसआयटीमार्फत चौकशी करावी व ग्राहकांना चटईक्षेत्राबाबत वेगवेगळे प्रमाणपत्र देणाऱ्या बिल्डर्स आणि आर्किटेक्ट्स यांना काळ्या यादीत टाकत त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ग्राहक पंचायतीचे विलास देवळे यांनी केली आहे. यापुढे फ्लॅटची विक्री नियमानुसार व मंजूर चटईक्षेत्रानुसारच पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही पत्रकात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)