बांधकाम व्यावसायिकांना इकडे आड, तिकडे विहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:25 AM2019-03-19T01:25:38+5:302019-03-19T01:26:29+5:30
महापालिकेच्या जुन्या बांधकाम नियंत्रण नियमावलीत वाहनतळाच्या अतिरिक्त जागेसह अन्य अडचणी कायम असतानाच आता नवीन नियमावलीतदेखील अनेक अडचणी आहेत.
नाशिक : महापालिकेच्या जुन्या बांधकाम नियंत्रण नियमावलीत वाहनतळाच्या अतिरिक्त जागेसह अन्य अडचणी कायम असतानाच आता नवीन नियमावलीतदेखील अनेक अडचणी आहेत. नवीन नियमावली लागू होण्यासाठी अवकाश असला तरी आता आधीच जाचक नियमावली असल्याने ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली आहे. त्यातच आॅटो डिसीआरचा प्रश्न अद्याप सुटलेला नसून अशावेळी नव्या नियमावलीच्या धास्तीने प्रकरणे दाखल करणेदेखील अडचणीचे ठरले आहे.
राज्यातील सर्व महापालिकांसाठी समान नियमावली तयार करण्यासाठी राज्य शासनाने ८ मार्च रोजी अधिसूचना जारी केली आहे. खरे तर सर्वत्र समान नियमावलीमुळे स्वागत करणे अपेक्षित असताना नाशिकला वेगळी वागणूक दिली गेल्याने बांधकाम व्यावसायिकात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ज्या ज्या ठिकाणी सोयीचे नियम आहेत. त्या त्या ठिकाणी नाशिकसाठी स्वतंत्र नियम, असा उल्लेख आहे. शिवाय चटई क्षेत्रात घट तसेच अॅमेनिटीजसाठी जादा क्षेत्र सोडावे लागणार आहे, तर वाहनतळांचा नियमदेखील इतका जाचक करण्यात आला आहे की, त्यामुळे आता तर शहरात नवीन बांधकाम करणे कठीण होणार आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्र धास्तावले आहे.
मुळात महापालिकेच्या जुन्या बांधकाम नियंत्रण नियमावलीत अनेक अडचणी असून, त्यात वाहनतळ हा जाचक मुद्दा आहे. मुंबई- पुणे आणि नागपूरपेक्षा नाशिकमध्ये अधिक वाहनांसाठी जागा सोडावी लागत आहे.
नाशिकच्या बांधकाम क्षेत्रावर झालेले आघात
हरित लवादाने नवीन बांधकामांना घातलेली सुमारे वर्षभराची बंदी.
छोट्या रस्त्यांच्या लगत बांधकामे करताना टीडीआर बंदी.
विकास आराखडा तयार करताना गोंधळ त्यामुळे रद्दची नामुष्की.
कपाट कोंडीत शेकडो प्रकरणे अडकली.
नवीन बांधकाम नियमावलीत वाहनतळ आणि अॅमेनिटीजला बंदी.
आॅटोडीसीआरमुळे प्रस्ताव दाखल करणेच अडचणीचे
किमान नऊ मीटर रस्त्याच्या अटीमुळेदेखील बांधकामांवर मर्यादा.