बिटको हॉस्पिटलचे बांधकाम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 04:46 PM2017-10-09T16:46:01+5:302017-10-09T16:46:11+5:30
नाशिक : महापालिकेमार्फत नाशिकरोड येथे उभारण्यात येत असलेल्या बिटको हॉस्पिटलच्या नवीन इमारतीचे बांधकाम रखडल्याने त्याबाबत स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. यावेळी, सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सदर बांधकामाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी कामांवर देखरेख ठेवण्यासाठी समिती नियुक्त करण्याचे जाहीर केले.
स्थायी समितीच्या सभेत सूर्यकांत लवटे यांनी बिटको रुग्णालयाच्या इमारतीचे काम अपूर्ण असतानाही प्रशासनाने अन्य साहित्य खरेदीचा सपाटा लावल्याचा आरोप केला. याशिवाय, सदर इमारत सात मजली बांधण्याचे प्रस्तावित असताना ती पाच मजलीच बांधण्यात येत असल्याने विविध वार्डची कुठे उभारणी करणार, असा सवालही उपस्थित केला. त्यावर स्पष्टीकरण देताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी सांगितले, सदर इमारत आधी सात मजली करण्याचे प्रस्तावित होते परंतु, काही कारणास्तव ती पाच मजली करण्यात आली. मात्र, तळमजल्यावरील मोकळ्या जागेचे रूपांतर सर्जरी, मेडिसीन या वार्डमध्ये करता येऊ शकेल. याशिवाय, हॉस्पिटलसाठी सध्या ४५० कर्मचारीवर्ग आहे. त्यातही वाढ करणे गरजेचे होणार आहे. निवृत्तांच्या बदल्यात सुमारे २५५ कर्मचारी भरतीचा प्रस्ताव आयुक्तांकडे दिला असल्याचेही डेकाटे यांनी सांगितले. लवटे यांनी मात्र, हॉस्पिटलमधील तळमजल्यावरील भिंतींचे बांधकाम तोडावे लागणार असल्याचे सांगत त्यामुळे महापालिकेचे मोठे नुकसान होणार असल्याकडे लक्ष वेधले. मुशीर सय्यद यांनीही बेडच्या संख्येनुसार स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना केली. चर्चेनंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी हॉस्पिटलच्या रखडलेल्या बांधकामांबद्दल नाराजी व्यक्त करत बांधकाम प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी समिती नियुक्त केली जाणार असल्याचे जाहीर केले. यावेळी शशिकांत जाधव यांनी सिडको व सातपूर भागात २०० बेडच्या हॉस्पिटलची आवश्यकता असल्याचे सांगत त्याबाबत कार्यवाहीची सूचना केली.