बांधकाम साहित्य पुन्हा रस्त्यावर
By admin | Published: June 18, 2014 01:11 AM2014-06-18T01:11:12+5:302014-06-18T01:17:28+5:30
बांधकाम साहित्य पुन्हा रस्त्यावर
नाशिक : शहरात बांधकामे करताना रस्त्याच्या कडेला रेबिट मटेरियल किंवा दगडविटा असे बांधकामाचे साहित्य परस्पर टाकणाऱ्यांना मनपाने तंबी दिली असली, तरी शहरातील अनेक भागांत रस्त्यांवर बांधकाम साहित्य टाकण्याचे प्रमाण वाढले आहे.
कोणत्याही ठिकाणी बांधकामे सुरू झाल्यानंतर अगोदरचे बांधकाम तोडणे किंवा बांधकामाचे उर्वरित साहित्य कुठेही टाकून दिले जाते. मोकळ्या मैदानावर तर विशेष करून टाकले जाते.(प्रतिनिधी)
इंद्रप्रस्थ पूल, गंगापूर धरण परिसर आणि इंदिरानगर या शिवार रस्त्याच्या कडेला बांधकामाचे साहित्य टाकले जाते. हे साहित्य अस्वच्छतेत भर घालत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली होती. यापुढे ही समस्या उद्भवू नये यासाठी बांधकामे करण्यापूर्वी महापालिकेच्या नगररचना विभागाला अशा साहित्याची विल्हेवाट कुठे लावणार त्याची हमी द्यावी लागते. तसा नियमही तयार करण्यात आला असल्याची माहिती तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी दिली होती; मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरातील मखमलाबादरोड, पेठरोड, गंगापूर नाका-हनुमानवाडी लिंकरोड, इंदिरानगर, अंबड, सातपूर आदि भागांत रस्त्यांच्या कडेला बांधकाम साहित्य पडून असल्याचे दिसून येते. या बांधकाम साहित्यामुळे परिसराला बकाल स्वरूप आले आहे. तसेच यामुळे अनेकदा रस्त्यात अडथळा निर्माण होऊन अपघाताच्या घटना घडत आहेत. यावरून पालिकेची कारवाई मंदावली की काय, अशी चर्चा सुरू आहे.