बांधकाम साहित्य रस्त्यावर
By admin | Published: July 2, 2014 10:09 PM2014-07-02T22:09:28+5:302014-07-03T00:21:25+5:30
बांधकाम साहित्य रस्त्यावर
पंचवटी : परिसरातील काही ठिकाणी घर, तसेच नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून, त्यासाठी लागणारी वाळू, खडी थेट रस्त्यावर टाकल्याने नागरिकांची, तसेच वाहनधारकांची गैरसोय झाली आहे. विशेष म्हणजे या साऱ्या प्रकाराकडे मनपाच्या संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रस्त्याच्या कडेला टाकलेली खडी, वाळू थेट रस्त्यावर आल्यामुळे वाहनधारक वाहने नेताना घसरून पडतात, तर काही ठिकाणी या बांधकाम साहित्यामुळे रस्ता बंद झाला आहे. जुना आडगाव नाका परिसरात अशीच परिस्थिती आहे. हिरावाडी रोडवरील चॉँदशावली बाबा दर्ग्याच्या मागे टोलेजंग इमारतीचे बांधकाम सुरू असून, वाळू व खडी थेट रस्त्यावरच टाकल्याने दर्ग्याच्या पाठीमागून जाणारा वाहतुकीचा रस्ता पूर्णपणे बंद झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. इतरवेळी बांधकाम साहित्य रस्त्यावर पडलेले दिसले, तर मनपा प्रशासन तत्काळ कारवाई करते. आता कारवाईस होणाऱ्या विलंबाबाबत संतप्त नागरिकांनी सवाल उपस्थित केला आहे.
अशीच परिस्थिती त्रिकोणी बंगला, अयोध्यानगरी भागात असून याठिकाणी बांधकाम करणाऱ्यांनी थेट रस्त्यावरच बांधकामासाठी लागणारे साहित्य टाकून रस्ता बंद केला आहे. (वार्ताहर)