अमरधाम प्रवेशद्वारावरच बांधली तिरडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 01:27 AM2019-02-25T01:27:27+5:302019-02-25T01:28:15+5:30
पिंपळगाव बसवंतजवळ दोन टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात ठार झालेल्या सात जणांच्या मृतदेहावर रात्री नाशिक येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले
नाशिक : पिंपळगाव बसवंतजवळ दोन टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात ठार झालेल्या सात जणांच्या मृतदेहावर रात्री नाशिक येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्व मृतदेह अमरधामच्या प्रवेशद्वारासमोर ठेवण्यात आले होते. वेळेअभावी या प्रवेशद्वारासमोरच तिरडी बांधण्यात येत होती. एका रांगेत ठेवलेले मृतदेह पाहून मृतांच्या नातेवाइकांनी हंबरडा फोडला.
पिंपळगावच्या ग्रामीण रुग्णालयात गर्दी झाल्याने राज्य शासनाच्या रुग्णवाहिकेने (१०८) मृतदेह हलविण्यात आले. सायंकाळी उशीर झाल्याने अंत्यसंस्कारासाठी सर्व मृतदेह नाशिक अमरधाम येथे आणण्यात आले. स्मशानभूमीच्या रस्त्यावर चार-पाच रु ग्णवाहिका तर प्रवेशद्वाराजवळ सर्व मृतदेह रांगेत ठेवलेले हे दृश्य पाहून नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. मृतांमध्ये कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाची मुलगी, तर कुणाचे वडील होते. त्यात सहा महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. एकाचवेळी एवढ्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रसंग आयुष्यात येईल, असे स्वप्नातही नातेवाइकांना वाटले नसावे.
उपस्थित अनेकांनी मृतांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला. अंत्यविधीसाठी लागणाऱ्या साहित्यापासून ते अग्निडागापर्यंतच्या अनेक कामांसाठी परिसरातील तरु णांनी सरसावले. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानंतर घडलेली दुर्घटना अनेकांचे संसार होत्याचे नव्हते करून गेली.
मृतदेह आणले अमरधाममध्ये
अपघातात मरण पावलेले सातही मृतदेह थेट नाशिक अमरधाम येथे आणण्यात आले. सकाळी देवकार्यासाठी निघालेल्या या दुर्दैवी कुटुंबीयांना त्यांचे मृतदेह घरीसुद्धा नेता आले नाही. सकाळी घराबाहेर पडलेला त्यांचा प्रवास अखेरचाच ठरला. अमरधामच्या प्रवेशद्वाराजवळच अंत्यविधीचे सोपस्कार पूर्ण करून गोदातीरी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.