भुजबळांच्या पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 12:49 AM2019-10-02T00:49:43+5:302019-10-02T00:50:11+5:30
नाशिक : येवला मतदारसंघातून शिवसेनेने आपल्या उमेदवाराची घोषणा करत त्यांच्याकडे ए व बी फॉर्मही सुपुर्द केल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पक्षांतराच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भुजबळ यांच्या पक्षांतरासाठी होणाऱ्या ‘तारीख पे तारीख’ची चर्चाही आता संपुष्टात आली आहे. भुजबळ हे येवला मतदारसंघातून राष्टÑवादीचे उमेदवार असतील व त्यांची लढाई २०१४ मधीलच प्रतिस्पर्ध्याशी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

येवला मतदारसंघातून गेल्या तीन निवडणुका लढविणारे छगन भुजबळ यांच्याविषयी यंदा निवडणुकीपूर्वी मतदारांमध्ये नाराजी असल्याच्या वार्ता पसरल्या होत्या. त्यातून भुजबळ यांना सेना जोरदार टक्कर देणार असल्याचेही बोलले जात होते. मध्यंतरी भुजबळ यांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाल्याचा फायदा विरोधकांनी उचलून त्यांच्याविषयी वातावरण तापविण्यास सुरुवात झाली व त्यातूनच भुजबळ सेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा पसरल्या
होत्या.
विशेष म्हणजे अशा प्रकारच्या संभ्रम निर्माण करणाºया चर्चा होत असताना भुजबळ यांच्याकडून तत्काळ त्याचे खंडणही केले जात नव्हते. त्यामुळे या चर्चांना पुष्टी मिळू लागली होती. दरम्यान, भुजबळ यांनी आपण राष्टÑवादीतच राहणार असा खुलासा केला. त्याचबरोबर त्यांच्या सेना प्रवेशाच्या वृत्तामुळे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मातोश्री गाठून तीव्र विरोध दर्शविला होता. त्यातून उद्धव ठाकरे यांनीदेखील भुजबळ यांना प्रवेश देणार नाही, असे जाहीर केले होते.
विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना शिवसेनेने येवला मतदारसंघातून आपल्या उमेदवाराला ए व बी फॉर्म सुपूर्द केला
आहे. त्यामुळे भुजबळ यांचे नाव आपोआपच मागे पडून त्यांच्या पक्षांतराची चर्चा संपुष्टात आली आहे. दुसरीकडे भुजबळ यांनीदेखील राष्ट्रवादीकडूनच येवल्यातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. जसजशी निवडणूक जवळ येत गेली, भुजबळ यांच्या पक्षांतराच्या चर्चा अधिक जोरात होऊ लागल्या होत्या. खुद्द भुजबळदेखील या काळात पक्षापासून दूर गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात भुजबळ सेनेत प्रवेश करतील अशा तारखा ठरविणारे मुहूर्त जाहीरही होत होते.