कट्ट्यातून गोळी सुटून युवकाचा मृत्यू
By admin | Published: August 8, 2016 01:03 AM2016-08-08T01:03:39+5:302016-08-08T01:04:17+5:30
मध्यरात्रीची घटना : संशयिताने गावठी कट्ट्यासह काढला पळ
सातपूर : अवैधरीत्या आणलेला गावठी कट्टा आपल्या मित्राला दाखवत असताना कट्ट्यातून गोळी सुटल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयितांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, सातपूर-अंबड लिंकरोडवर हिंद इंडस्ट्रीज वखारीच्या आवारात रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोघा परप्रांतीय मित्राकडे अनधिकृत गावठी कट्टा होता. त्या कट्ट्याची चाचणी घेत असताना अचानकपणे गोळी सुटली आणि यामध्ये बिहार राज्यातील युवक मंगल अनिरुद्ध मांझी (२४) या तरुणाचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणातील अन्य संशायितांचा शोध सुरू आहे. एकूण पाच संशयितांपैकी दोघांची नावे समोर आली असून उर्वरित तिघांचाही लवकरच सुगावा लागणार असल्याचा विश्वास सातपूर पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत सातपूर गुन्हे शोध पथकाला सूचना देण्यात आल्या असून, लवकरच पाचही संशयितांना अटक केली जाणार असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.
कट्ट्यातून गोळी सुटताच मयताच्या मित्राने घटनास्थळावरून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. या संशयितांनी घटनास्थळावरून गावठी कट्टाही पळविला आहे. बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार रमेश दराडे यांनी रीतसर फिर्याद दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)